ट्रकच्या चाकाखाली चिरडल्याने मांजरीतील युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 03:54 PM2018-01-09T15:54:24+5:302018-01-09T17:04:09+5:30
मांजरी बुद्रुक घुलेवस्ती येथील अपघातात युवकाचा मृत्यू झाला असून मृत सौरभ दिलीप टिळेकर (वय २२) हा जागीच ठार झाला आहे. सौरभ हा मांजरीमार्गे महादेवनगरच्या दिशेने चालला होता.
मांजरी : मांजरी बुद्रुक घुलेवस्ती येथील अपघातात युवकाचा मृत्यू झाला असून मृत सौरभ दिलीप टिळेकर (वय २२) हा जागीच ठार झाला आहे. सौरभ हा मांजरीमार्गे महादेवनगरच्या दिशेने चालला होता. या वेळी ट्रक क्र. एम. एच. १२ डी. टी. ७१२९ हा सिमेंट वाहक ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून सौरभचा जागीच मृत्यू झाला.
घटना घडण्यापूर्वी महादेवनगर येथे सौरभचा किरकोळ अपघात झाला होता, त्यानंतर गाडी दुरूस्ती करण्यासाठी गॅरेजला टाकली व गाडी दुरूस्ती करून तो घरी जाण्यासाठी निघाला असता काही क्षणात हा अपघात घडला. सौरभ येवलेवाडी येथील सिंहगड इन्स्टिट्यूट या महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. घडलेल्या घटनास्थळापासून जवळच सौरभचे घर आहे. घडलेल्या घटनेमुळे महादेवनगर, मांजरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहे.
दरम्यान सौरभचे नेत्र दान करण्याचा निर्णय त्याच्या कुटुंबीयांनी घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे, सामाजिक जाणिवेचे स्वागत होत आहे.