नदीजोड बोगद्यात ८ मजुरांचा मृत्यू, वायररोप तुटून क्रेन २०० फूट खोल कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 06:22 AM2017-11-21T06:22:24+5:302017-11-21T06:22:41+5:30
अकोले (जि. पुणे) : निरा-भीमा नदीजोड बोगद्याच्या कामातील के्रेन तुटल्याने, ती दोनशे फूट खोल कोसळून ८ मजुरांचा दुर्दैवी अंत झाला. ही दुर्घटना सोमवारी सायंकाळी इंदापूर तालुक्यातील अकोले येथे घडली.
अकोले (जि. पुणे) : निरा-भीमा नदीजोड बोगद्याच्या कामातील के्रेन तुटल्याने, ती दोनशे फूट खोल कोसळून ८ मजुरांचा दुर्दैवी अंत झाला. ही दुर्घटना सोमवारी सायंकाळी इंदापूर तालुक्यातील अकोले येथे घडली.
निरा-भीमा नदीजोड प्रकल्पाचे काम तावशी ते डाळज या २४ किलोमीटर अंतराच्या सहा टप्प्यांत जलदगतीने सुरू आहे. सुमारे तीन किलोमीटर अंतरावर शाफ्ट खोदून बोगद्याची खोदकाम सुरू आहे. या ठिकाणी जमिनीपासून सुमारे १०० फूट खोल बोगदा तयार करण्यात आला असून, आतमध्ये मशिनच्या साह्याने खोदकाम सुरू आहे. या ठिकाणी ३०० कामगार काम करीत असून, जेसीबी मशिन, मालवाहतूक करण्यासाठीची वाहने यांच्या मदतीने काम सुरू आहे.
सायंकाळी बोगद्यातील काम उरकून ९ कामगार क्रेनमधून वर येत होते. या वेळी क्रेन निम्म्यापर्यंत आल्यावर तिचा रोप तुटला. त्यामुळे हे कामगार २०० फूट खोल बोगद्यात कोसळले. सायंकाळी ७ वाजेपर्यंत ५ कामगारांचे मृतदेह वर काढण्यात आले होते. आणखी तीन कामगारांचे मृतदेह वर काढण्यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. पोलीस प्रशासन, रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी रवाना झाले.
>मृत मजूर परराज्यांमधील
बलराम स्वामी, सुशांत पंढी, राहुळ सुग्रीव नरूटे, मुकेश कुमार, अन्वेश सिद्धारेड्डी अशी पाच मृतांची नावे आहेत. अन्य तिघांची नावे समजू शकली नाहीत. हे सर्व जण उत्तर प्रदेश, ओडिशा, आंध्र प्रदेश येथील आहेत.
>केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
निरा-भीमा नदीजोड प्रकल्प हा केंद्र सरकारचा प्रकल्प आहे. त्याचे काम २०१२ रोजी सुरू झाले. मात्र, सरकारकडून निधी मिळत नसल्याने मध्यंतरी दोन वर्षे काम बंद होते. तावशी ते डाळजपर्यंत सोमा आणि मोहिते या कंपनीच्या वतीने काम सुरू आहे.प्रकल्पाचा मुख्य हेतू निरा नदीतून येणारे पाणी उजनी धरणात वळवून उस्मानाबाद, सोलापूरसह पुणे जिल्ह्यातील शेतीला देण्यात येणार आहे. बोगद्यातील रुंदी आठ मीटरपर्यंत असणार आहे.
> मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दुर्घटनेची माहिती घेतली असून, मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाखांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. सोमा एंटरप्रायजेस या कंपनीतर्फे मृतांच्या नातेवाइकांना तीन लाखांची मदत देण्यात येणार आहे.
दुर्घटनेनंतर कामगारांनी दुसºया क्रेनचा वापर करून
मजुरांचे मृतदेह वर काढले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी घटनास्थळी भेट दिली. दुर्घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांनी सांगितले.
>इंदापूर तालुक्यातील (जि. पुणे) अकोले येथे निरा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाच्या ठिकाणी बोगद्यात काम सुरू असताना, सोमवारी क्रेन तुटल्याने ८ मजुरांचा मृत्यू झाला. मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू असताना नागरिकांनी गर्दी केली होती.