मुलापाठोपाठ आरोपीच्या आईचाही मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 11:51 PM2017-08-13T23:51:02+5:302017-08-13T23:51:05+5:30
मांढरदेव येथे झालेल्या विषप्रयोग प्रकरणातील अत्यवस्थ असणाºया आणखी एकाचा शनिवारी (दि. १२) मध्यरात्री मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : मांढरदेव येथे झालेल्या विषप्रयोग प्रकरणातील अत्यवस्थ असणाºया आणखी एकाचा शनिवारी (दि. १२) मध्यरात्री मृत्यू झाला. मुक्ताबाई नारायण चव्हाण (वय ६५) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. मुलापाठोपाठ आरोपीच्या आईचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात मृतांची संख्या दोनवर पोहचली आहे. तर आरोपीची पत्नी, दोन मुलींवर सातारा येथे उपचार सुरू आहेत.
दि.२६ जुलै रोजी या कुटुंबातील आरोपी विष्णूपंत चव्हाण वगळता त्याची आई, पत्नी, दोन मुली, मुलगा मांढरदेवीच्या डोंगरावर गेल्या होत्या. जाण्यापूर्वीच आरोपी विष्णूपंत याने देवऋषीने करणी काढण्यासाठी ‘अमृत’ दिले आहे. देवीचे दर्शन झाल्यानंतर तेथे सर्वांनी प्या, त्याचा उग्र वास येईल. पिल्यानंतर उलटी होईल, परंतु, जितक्या उलट्या होतील, तेवढी करणी बाहेर पडेल, असे त्यांना सांगितले होते. आरोपी चव्हाण याची आई मुक्ताबाई नारायण चव्हाण, पत्नी सविता विष्णूपंत चव्हाण, मुलगी प्रतीक्षा विष्णूपंत चव्हाण, तृप्ती विष्णूपंत चव्हाण आणि मुलगा स्वप्नील विष्णूपंत चव्हाण यांनी मांढरदेवीला गेल्यानंतर दर्शनानंतर सांगितल्याप्रमाणे बाटलीतील साखरेच्या पाकात असलेले विषारी औषध प्राशन केले. त्याच दिवशी मुलगा स्वप्निल याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कुटुंबातील इतर चौघांवर उपचार सुरू होते. त्यापैकी शनिवारी रात्री १२ वाजता (दि.१२) आरोपीची आई मुक्ताबाई नारायण चव्हाण (वय ६५) यांचा मृृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह रविवारी (दि.३०) बारामती शहरात आणण्यात आला. नातेवाइकांनी मुक्ताबाई यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
स्वप्निलपाठोपाठ त्याच्या आजीचादेखील मृत्यू झाल्याने बारामती शहरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या प्रकरणी २७ जुलै रोजी अटक करण्यात आलेला आरोपी विष्णूपंत चव्हाण सातारा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.