मराठी प्रकाशक परिषदेचे अध्यक्ष अरुण जाखडे यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 01:19 PM2022-01-16T13:19:50+5:302022-01-16T13:19:58+5:30

मेहता पब्लिशिंग हाऊसचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांच्या निधनानंतर दुसरा मोठा प्रकाशक गेल्याने प्रकाशनविश्वासह साहित्य क्षेत्राला धक्का बसला

death of arun jakhade president of marathi publishers council | मराठी प्रकाशक परिषदेचे अध्यक्ष अरुण जाखडे यांचे निधन

मराठी प्रकाशक परिषदेचे अध्यक्ष अरुण जाखडे यांचे निधन

Next

पुणे : पद्मगंधा प्रकाशनाचे प्रमुख आणि मराठी प्रकाशक परिषदेचे अध्यक्ष अरुण जाखडे (वय 65) यांचे रविवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांच्या निधनानंतर दुसरा मोठा प्रकाशक गेल्याने प्रकाशनविश्वासह साहित्य क्षेत्राला धक्का बसला आहे.  

प्रकाशन व्यवसायात अरुण जाखडे यांचे बहुमूल्य योगदान आहे. नगरच्या आष्टीसारख्या निसर्गरम्य ग्रामीण भागात त्यांचे बालपण गेले. या वातावरणाचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. निसर्गासह माणसे, जनावरे, पशुपक्षी यांच्यातही ते रमले. त्यांच्या या अनुभवाचा फायदा त्यांना 'इर्जिक' या स्तंभलेखनासाठी झाला. विशेष प्रकल्पाचे नियोजन करून काम करणे हे पद्मगंधा प्रकाशनाचे वैशिष्ट्य . या कार्यपद्धतीमुळे त्यांनी पद्मगंधा प्रकाशनाच्या माध्यमातून वाङ्मयीन विश्वात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. 
 
बालवाडमय, विज्ञान, इतिहास आदी विषयांवर पुस्तके प्रकाशित

महाराष्ट्राची कुलस्वामिनी, भाग्यविधाती, सर्जक आणि संगोपक अशी श्री तुळजाभवानी मातेच्या प्राचीन मिथकाची प्रेरकता उलगडणारा डाॅ. रा. चिं.ढेरे लिखित श्री तुळजाभवानी हा ग्रंथ तसेच रघुनाथ धोंडो कर्वे या विसाव्या शतकातील विचारावंतांचे विचारधन आठ खंडात कोणत्याही अनुवादाशिवाय त्यांनी प्रकाशित केले. हा प्रकल्प पूर्ण करण्यास सहा वर्षे लागली होती. याशिवाय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, पाचरुट, पावसाचे विज्ञान, प्रयोगशाळेत काम कसे करावे, भारताचा स्वातंत्र्यलढा,भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण,विश्वरूपी रबर,शोधवेडाच्या कथा आदी विपुल साहित्य त्यांनी प्रकशित केले. लेखक खुशवंत सिंग यांच्या इंग्रजी कथासंग्रहाचा मराठी अनुवाद पद्मगंधातर्फे प्रकाशित करण्यात आला होता. याशिवाय बालवाडमय, विज्ञान, इतिहास आदी अनेक विषयांवर त्यांनी पुस्तके प्रकाशित केली. त्यांना फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स दिल्ली संस्थेतर्फे उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीचे सहा पुरस्कार तसेच राज्य शासनाचा उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती साठी दिला जाणारा ' श्री. पु भागवत पुरस्कार अशा विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले. 

Web Title: death of arun jakhade president of marathi publishers council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.