पाण्याविना ‘डिहायड्रेशन’ होऊन पक्ष्यांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2020 03:29 PM2020-03-01T15:29:37+5:302020-03-01T15:31:17+5:30
घर तिथे हवा पक्ष्यांना पाणवठा; उन्हाळ्यात होते तडफड
- श्रीकिशन काळे
पुणे : उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरुवात झाली असताना पक्ष्यांची काळजी घेण्याची गरज पक्षी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कडक उन्हात पक्ष्यांना पुरेसे पाणी पिण्यासाठी न मिळाल्यास निर्जलीकरणामुळे (डिहायड्रेशन) उडत असतानाच त्यांचा मृत्यू होण्याच्या घटना घडतात. अशा घटना घडू लागल्या असून ‘डिहायड्रेशन’चा त्रास झाल्याने दोन-तीन पक्षांना उपचारासाठी नुकतेच राजीव गांधी प्राणी संग्रहालयात दाखल गेले. येत्या काही दिवसात उन्हाचा कडाका वाढणार असल्याने पक्ष्यांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे.
मानवाप्रमाणेच पक्ष्यांमध्येही उत्सर्जन प्रणाली असते. माणसाप्रमाणेच पक्ष्यांनाही पाण्याची गरज असते. शरीराला नको असलेली नत्रयुक्त टाकाऊ पदार्थ बाहेर फेकण्यासाठी मुत्रपिंडांचा (किडनी) उपयोग होतो. पक्ष्यांनाही दोन किडनी असतात. या किडन्या त्यांच्या पाठीच्या बाजूला असतात. शरीरातील नत्र बाहेर टाकण्यासाठी पाण्याची गरज असते. पक्ष्यांना मूत्राशय नसत्याने मूत्र त्यांच्या शरीरात साठत नाही. पक्ष्यांना घामाच्या ग्रंथीही नसतात. त्यामुळे शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेरटाकण्यासाठी एकच मार्ग असतो आणि त्यासाठी पाणी अत्यावश्यक असते. ते न मिळाल्यास निर्जलीकरण होऊन पक्ष्यांना किडनीचे विकार होतात. यामुळे पक्ष्यांचा मृत्यू होतो, अशी माहिती पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी दिली.पुणे इन्स्टिट्यूट आॅफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या संगणक विभागातील सहायक प्राध्यापक योगेश हांडगे यांनी घरी कृत्रिम पाणवठे तयार केले असून गच्चीवर, बाल्कनीत, तसेच बागांमध्ये मातीची उथळ भांडी पाण्याने भरली आहेत. वाढत्या उन्हाळ्यात वन्यजीव व पक्ष्यांना जीवदान देण्यासाठी ‘घर तिथे पक्षी पाणवठा’ ही संकल्पना राबवणे गरजेचे असल्याचे हांडगे म्हणाले.
...........
सध्या दिवसाला तीन-चार पक्षी उपचारासाठी आमच्याकडे येतात. उन्हाळ््यात यात खूप वाढ होते. शहरात इमारती खूप झाल्याने पक्ष्यांना सहजपणे पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. पूर्वीसारखे पाणवठे आता नाहीत. त्यामुळे नागरिकांनी पक्ष्यांसाठी सावली आणि पाण्याची सोय करायला हवी.
- डॉ. सुचित्रा सूर्यवंशी, पशुवैद्यकीय तज्ज्ञ, राजीव गांधी प्राणिसंग्रहालय
........................
उन्हाळ्यात आम्ही तळजाईवर पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करतो. कारण काही वर्षांपूर्वी आम्ही तिथे पक्षी पाण्याविना उडता-उडता जमिनीवर पडलेले पाहिले आहेत. तळजाईवर मोठी तळी करून त्यात आता पाण्याची सोय आम्ही करतो. नुकतेच आम्ही महात्मा फुले मंडईतही पक्ष्यांसाठी पाण्याची मातीची भांडी ठेवली आहेत. शहरातील इतत्रही नागरिकांनी पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करायला हवी.
- लोकेश बापट, पक्षीप्रेमी