रस्ता रूंदीकरणात आले मरण, पर्यावरणप्रेमींमुळे ‘औदुंबर’ला मिळाले पुन्हा जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 02:41 PM2020-09-01T14:41:16+5:302020-09-01T14:41:52+5:30
शंभर वर्षांहून अधिक वयाच्या उंबराला जीवदान
श्रीकिशन काळे-
पुणे : शंभर वर्षांचा तो ‘औदुंबर’ रस्त्यालगत मरणासन्न अवस्थेत पडून होता. त्याला जाळण्याचा प्रयत्न झाला, त्यावर उकळते डांबर टाकले. पण तरीही तो संपला नाही. त्याच्या अनेक वर्षांची सेवा पाहून एकाने त्याला पुनर्जिवित करण्याचे ठरवले आणि जेसीबीने उचलून त्याला ट्रकमध्ये टाकले. २५ जून २०२० रोजी त्याचे पुनर्रोपण केले आणि आता त्याच्या मुळामध्ये छोटी-छोटी हिरवी पाने अंकुरली आहेत. तो ‘औदुंबर’ म्हणजे उंबर आता सुरक्षितपणे फुलण्यासाठी सज्ज झाला आहे.
जेजुरी परिसरातील मोरगाव रस्त्याचे रूंदीकरण करण्यासाठी अडीचशे वर्षांचे वड आणि शंभर पार केलेले उंबराचे झाड तोडण्यात आले होते. वडाचे तुकडे केले. पण उंबराचे खोड खूप मोठे होते. खोडाला जमिनीतून वर काढून रस्त्यालगत फेकले. तिथे त्याला जाळले पण ते खूप मोठे असल्याने संपूर्ण जळाले नाही. त्यानंतर परिसरातील पर्यावरणप्रेमी प्रसन्न शहा यांनी ते पाहिले. त्या झाडाखाली ते अनेकदा सावलीसाठी थांबले होते. त्यांच्या अनेक आठवणी तिथे होत्या. शहा यांनी खोडाचे पुनर्रोपण करण्यासाठी इला फांउडेशनकडे संपर्क साधला. त्यानंतर या खोडाला वाचविण्याचा प्रयत्न सुरू केला. दहा-दहा फुटांच्या मुळा कापल्या होत्या. कापलेले खोड खूप मोठे असल्याने त्याला जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यावर डांबर ओतलं. पण ते तरी तसेच होते. जळाल्याने अंगावरील खपल्या निघत होत्या. त्याला जेसीबीनच्या मदतीने ट्रकमध्ये टाकून जेजुरी परिसरातील इला फांउडेशनमध्ये आणले. यासाठी शहा, गणेश झगडे, सागर पवार, अमित भापकर यांचे सहकार्य मिळाले.
साडेसात महिने ते खोड जमिनीवर पडलेले होते. उंबर हे दीर्घाष्युषी असते. त्याची ऊर्जा खोडात सामावेलेली असते. त्यामुळे हे खोड २२ जून २०२० रोजी इला फांउडेशनकडे एका जेसीबीने ट्रकमध्ये टाकून आणण्यात आले. त्याला योग्य प्रकारे पुनर्रोपित केले. तीन-चार महिने तरी त्याच्याकडून काही प्रतिसाद येणार नाही, अशी सर्वांची अपेक्षा होती. पण वरूणराजाच्या कृपेने हे खोड अंकुरले. प्राण नसलेल्या देहात जणू पुन्हा श्वास यावा आणि तो देह जीवंत व्हावा, असाच अनुभव या खोडामुळे आल्याची भावना इला फांउडेशनमधील सुरूची पांडे यांनी व्यक्त केली. १४ जुलै २०२० रोजी हे अंकुर दिसले. मुळाच्या बाजूने तेरा हिरवी पाने दिसून आली. उन्हामध्ये ती चकाकत होती. उंबराच्या जीवंतपणाची ती खूणच होती.
या झाडाखाली सद्गुरु दत्ताचे स्थान असते अशी लोकांची श्रद्धा आहे. म्हणून याला औदुंबर असे म्हटले जाते. हे झाड जमिनीतील पाण्याचा साठा दर्शवते. हे झाड जिथे असेल तिथे पाण्याचा साठा निर्माण होतो शिवाय हे २४ तास प्राणवायू हवेत सोडते. या झाडाचे फूल कधीच दिसत नाही.
धार्मिक महत्त्व
या झाडाच्या सुकलेल्या काड्या होमहवनात समिधा म्हणून अर्पण करतात. या झाडाची पूजा केली जाते.
औषधी उपयोग
या झाडाची पाने वाटून विंचू चावल्यावर लावल्यास वेदना कमी होतात. गालगुंडावर या झाडाच्या चिकाचा लेप लावल्यास त्याची तीव्रता कमी होते. या झाडाच्या पानांवरील फोडांचा उपयोग वांतीवर केला जातो. गोवर, उचकी, अतिसार, उन्हाळी, मधुमेह इत्यादी रोगांवर उंबराची फळे, फुले व पाने उपयोगी पडतात.