विजेच्या धक्क्याने मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 02:56 AM2018-08-19T02:56:05+5:302018-08-19T02:56:59+5:30

वारजे येथील बाह्यवळण महामार्गावरील सेवारस्त्यावर विजेच्या खांबात वीजप्रवाह उतरून त्याचा धक्का बसून झालेल्या अपघातात एका शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे

Death of a child by electricity shocks | विजेच्या धक्क्याने मुलाचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने मुलाचा मृत्यू

Next

वारजे : वारजे येथील बाह्यवळण महामार्गावरील सेवारस्त्यावर विजेच्या खांबात वीजप्रवाह उतरून त्याचा धक्का बसून झालेल्या अपघातात एका शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पृथ्वीराज विशाल चव्हाण (वय १२, रा. साई कॉलनी वारजे माळवाडी, मूळ गाव मूलखेड, मुळशी) असे मृत मुलाचे नाव आहे.
याबाबत पोलीस व प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या महितीनुसार पृथ्वीराज येथील रोझरी शाळेत सहाव्या इयत्तेत शिकतो. अपघात झाला त्या ठिकाणी नागरिकांना प्रभातफेरीसाठी जॉगिंग ट्रॅक व ओपन जिम तयार करण्यात आली आहे. या ठिकाणी दररोज हजारो नागरिक याचा लाभ घेत असतात. आज शनिवारी शाळेला सुटी असल्याने पृथ्वीराज येथे सायकल चालविण्यासाठी व खेळण्यासाठी आला होता.
येथील रुणवाल सोसायटीसमोरील पदपथाशेजारील विजेच्या खांबाच्या संपर्कात आल्याने तो चिकटून खाली पडला. यावेळी मला करंट लागला, असा तो मोठ्याने ओरडून निपचित पडल्याचे येथून जाणाऱ्या काही लोकांनी सांगितले.
त्याच्याबरोबर खेळणाºया मित्राने हे पाहून त्याच्या घरी कळविण्यासाठी धाव घेतली. दरम्यान, येथील सह्याद्री कुस्ती संकुलातील पैलवान व्यायाम व प्रभातफेरी उरकून याच रस्त्याने संकुलाकडे परतत असताना त्यांनी खांबाला चिकटून मुलगा पडल्याचे पाहिले. येथील कोच सियानंद व महेश पाटील यांनी फळीच्या सहाय्याने मुलास बाजूला घेऊन जवळच्या मंगेशकर रुग्णालयात नेले. तेथे तपासणी केली असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
यानंतर महावितरण कर्मचाºयांनी कार्यक्षेत्र नसतानाही या ठिकाणी तातडीने हालचाल करीत येथील सर्व खांबांचा वीजपुरवठा तातडीने बंद
केला. पृथ्वीराज अतिशय मनमिळाऊ व (आठवड्यावर रक्षाबंधन सण असताना) एका बहिणीनंतरचा एकुलता मुलगा असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत महावितरणचे कोथरूड सहायक अभियंता धवल सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांच्यानुसार हे खांब महापालिकेने बसवले असून त्याची देखभाल दुरुस्ती पालिकेमार्फतच होत आहे. या अपघाताशी महावितरणचा काही संबंध नाही.
येथे संध्याकाळी खांब उघडून केलेल्या अधिकच्या तपासणीत खांबाच्या दिव्याजवळील वळणावर वायर दुमडल्याने घासून त्यावरील आवरण हटले व वीजवाहक खुल्या तारा लोखंडी खांबाच्या संपर्कात आल्याने विजेचा प्रवाह उतरल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसत आहे.

खांबांना अर्थिंग नाही?
तीन वर्षांपूर्वी महापालिकेने येथे सुशोभीकरण केले असून या खांबावर पथदिवे व नागरिकांच्या सोयीसाठी स्पीकर्स बसवण्यात आले आहेत. तसेच पदपथ व ओपन जिमदेखील विकसित करण्यात आले आहेत. असे असूनही या तीन वर्षांत या खांबांना अर्थिंग का देण्यात आले नाही, यावर महापालिकेचा कोणताही अधिकारी बोलण्यास तयार नाही. तसेच येथे मोठा गाजावाजा करून बसवण्यात आलेले स्पीकर्सदेखील वर्षभरापासून बंदच आहेत. कोट्यवधी रुपये खर्चून सुशोभीकरण करणाºया पालिका प्रशासनाला अर्थिंगचा किरकोळ खर्च कसा परवडत नाही, हा प्रश्न आहे.

तीन वर्षांपूर्वी हे काम झाले असून, याची देखभाल दुरुस्ती क्षेत्रीय कार्यालयामार्फत करण्यात येते. आजच्या अपघाताबद्दल विद्युत निरीक्षक यांचा व ससूनचा उत्तरीय तपासणी अहवाल आल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल. उद्यापासून या भागासह संपूर्ण शहरात पोल आयडेंटिफिकेशन व अर्थिंगसह सर्वच तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. अधीक्षक कंदुल यांनी उद्या रविवारीदेखील कामे सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- रामदास तारू, प्रभारी,
अधीक्षक अभियंता, मुख्य खाते, पुणे मनपा

घडलेली घटना अतिशय वाईट असून या रस्त्याने सकाळी हजारो नागरिक प्रभातफेरीसाठी जातात. सोमवारी शाळेतील सर्व मुलांची विशेष बैठक घेऊन कुठल्याही विजेच्या खांबांना स्पर्श न करण्याच्या सूचना करणार आहोत.
- विजय बराटे
अध्यक्ष, सह्याद्री शाळा व कुस्ती संकुल

Web Title: Death of a child by electricity shocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे