पवना धरणात बुडून संगणक अभियंत्याचा मृत्यु
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 06:31 PM2019-04-20T18:31:25+5:302019-04-20T18:35:20+5:30
हिंजवडी आयटी पार्क येथील पाच जण आज दुपारी पवनाधरण परिसरात फिरायला आले होते.
लोणावळा : मावळ तालुक्यातील पवना धरणात बुडून आज एका संगणक अभियंत्याचा दुदैवी मृत्यु झाला. मागील दहा दिवसांत या धरणात तीन युवकांचा बुडून मृत्यु झाला आहे.अतुल अनिलकुमार गगन (वय २३ , रा. पटना, सध्या रा. इन्फोसिस, हिंजवडी) असे या मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.
हिंजवडी आयटी पार्क येथील पाच जण आज दुपारी पवनाधरण परिसरात फिरायला आले होते. शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या वाजण्याच्या सुमारास ते धरणात पोहण्याकरिता उतरले असता पाण्यात बुडून अतुलचा मृत्यु झाला. घटनेची माहिती समजताच लोणावळा ग्रामीण पोलीस व शिवदुर्ग मित्रची रेस्कू टिम घटनास्थळी दाखल झाली. शिवदुर्गचे महेश मसणे, सागर कुंभार, राहुल देशमुख, मोरेश्वर मांडेकर, स्वप्निल भांगरे, विकास मावकर, दुर्वेश साठे, गणेश गायकवाड, योगेश उंबरे,राजेंद्र कडु, सुनिल गायकवाड यांच्या पथकाने सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास वाजण्याच्या सुमारास सदरचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. ९ एप्रिल रोजी देखिल याच धरणात बुडून पुण्यातील दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यु झाला.
पवना धरणाचा परिसर हा अथांग पसरलेला आहे. धरणाच्या पाण्यात कोणी उतरु नये याकरिता काही भागात सुरक्षा तार लावण्यात आली आहे तर काही भागात सहजपणे पाण्यात उतरा येत असल्याने पर्यटनाकरिता या भागात येणारे पर्यटन पाण्यात पोहण्याकरिता उतरतात मात्र या भागात पाटबंधारे विभाग अथवा ग्रामीण पोलीसांकडून गस्त घातली जात नसल्याने प्राणांतिक घटना घडत आहेत. पोलीस प्रशासन व पाटबंधारे विभाग यांनी गस्तीचे योग्य नियोजन केल्यास या धरणातील अपघातांच्या घटना ठळू शकतील अशी अपेक्षा या परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत. तसेच पर्यटकांनी देखिल जीव धोक्यात घालून पाण्यात उतरु नये असे आवाहन करण्यात आले आहे.