खडकवासला येथील कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या पती पत्नीचा पाण्यात बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 07:31 PM2020-03-03T19:31:51+5:302020-03-03T19:34:29+5:30
तोल जाऊन पाण्यात पडलेल्या पतीला वाचवण्यासाठी पत्नीने घेतली उडी
पुणे : खडकवासला येथील कालव्यात सकाळी नऊच्या सुमारास कैलास चव्हाण हे पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी अचानक त्यांचा तोल गेल्यामुळे पत्नीने त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. परंतु पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. ही घटना सिंहगड रस्त्यावरील खडकवासला येथील कालव्यामध्ये मंगळवारी ( दि. ३ ) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोहण्यासाठी गेलेल्या पती - पत्नीचा तोल गेल्याने पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला. कैलास राजेंद्र चव्हाण ( वय ३८ ) आणि रेश्मा कैलास चव्हाण ( वय ३५ ) (लक्ष्मी स्पर्श सोसायटी, एनडीए गेटजवळ, कोंढवे धावडे, पुणे) अशी मयत पती - पत्नीची नावे आहेत . ही घटना सिंहगड रस्त्यावरील खडकवासला येथील कालव्यामध्ये मंगळवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
काही नागरिकांनी अग्निशमन दलाला खबर दिल्याने नांदेड सिटी अग्निशमन दलाच्या जवानांनी कालव्याच्या दिशेने शोधमोहीम सुरू केली असता त्यांचा मृतदेह धायरी येथील कालव्यामध्ये आढळून आला. जवानांनी दोरखंडाच्या सहाय्याने कालव्यातून दोन्ही मृतदेह बाहेर काढले. मयत कैलास चव्हाण यांचा चष्मा विक्रीचा व्यवसाय होता. तर त्यांच्या पत्नी रेश्मा ह्या संगीत विशारद होत्या. त्यांना एक चार वर्षांची मुलगी आहे. याबाबत सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात याबाबत अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस हवालदार रुस्तुम शेख करीत आहेत. घटना हवेली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्याने पुढील तपासासाठी हवेली पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात येणार आहे.