भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात पाडसाचा मृत्यू
By admin | Published: May 8, 2017 02:08 AM2017-05-08T02:08:13+5:302017-05-08T02:08:13+5:30
बारामती तालुक्यातील मुढाळे गावच्या वनविभागाच्या हद्दीलगत मुळीकवस्तीजवळ हरणांच्या कळपावर भटक्या कुत्र्यांच्या टोळीने
लोकमत न्यूज नेटवर्क
वडगाव निंबाळकर : बारामती तालुक्यातील मुढाळे गावच्या वनविभागाच्या हद्दीलगत मुळीकवस्तीजवळ हरणांच्या कळपावर भटक्या कुत्र्यांच्या टोळीने हल्ला चढवला. यामध्ये एका पाडसाचा मृत्यू झाला. शनिवारी (ता. ६) सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली.
अन्नपाण्याच्या शोधात सकाळपासून हरणांचा कळप मानवीवस्तीलगत फिरत होता. या परिसरातील कुत्र्यांच्या टोळीने कळपाचा पाठलाग केला. यामध्ये पाडस कळपातून पाठीमागे राहिल्याने कुत्र्यांनी त्याचा चावा घेतला. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी कुत्र्यांना हुसकावले. पण चाव्याची जखम खोल असल्याने पाडसाचा जागीच मृत्यू झाला. याबाबत जमीर मुजावर, दत्तात्रेय खोपडे, शिवाजी मुळीक, प्रतीक मुळीक या तरुणांनी झालेल्या अपघाताची माहिती वनविभागाला कळवली.
वनमजूर एसबी पानसांडे यांच्यासह ४ वनमजुरांनी पंचनामा करून पाडस ताब्यात घेतले. मुढाळे गावालगत वनविभागाची मोठी जमीन आहे. या ठिकाणी हरणांची संख्या जास्त आहे. गेल्या महिन्याभरापासून वनहद्दीतील प्राण्यांचे अन्नपाण्यावाचून हाल होत असल्याने त्यांची सोय करावी, अशी मागणी जोर धरत होती. पण बारामती वनविभागाने ग्रामस्थांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले.
या ठिकाणी कृत्रिम पाणवठे आहेत. मात्र त्यात घाण साचली आहे. जमिनीवरील टाक्यात पाणीच टिकत नसल्याचे चित्र आहे. परिणामी या भागातील हरणांचे कळप बागायती भागातील मनुष्यवस्तीकडे येतात. मानवीवस्तीजवळ कुत्र्यांची संख्या अधिक असते. या परिसरात पोल्ट्री असल्याने मृत कोंबड्या उघड्यावर टाकल्या जातात.
कोंबड्यांच्या मांसावर चटावलेल्या कुत्र्यांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत. याच टोळ्या हरणांच्या कळपावरही नजर ठेवतात. आजारी हरिण किंवा पाडसावर आक्रमण करून जखमी करतात. यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. शनिवारी सकाळी कुत्र्यांनी हरणाच्या पाडसाचा पाठलाग केल्याचे जवळच्या शेतकऱ्याने पाहिले होते. कुत्र्यांना हटकण्याचा प्रयत्नही त्यांनी केला, पण कुत्र्यांच्या
चाव्याने घाबरलेल्या पाडसाचा मृत्यू झाला होता. यापुढे वनविभागने येथील हरणांची काळजी घेतली पाहिजे. अन्नपाण्याची सोय केली पाहिजे, अशी अपेक्षा प्राणीमित्रांनी केली आहे.
कुत्र्यांचा बंदोबस्त करणार
यापुढे असे अपघात होणार नाहीत, यासाठी कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात येईल. परिसरातील पोल्ट्रीमालकांना सक्त सूचना देण्यात येणार आहेत. पाणीसाठ्याबाबत पाहणी करून योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती तालुका वनअधिकारी शिवाजी राऊत यांनी दिली.