मारहाण झालेल्या सासऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू; फरार जावयावर हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 15:59 IST2018-01-19T15:56:53+5:302018-01-19T15:59:46+5:30
मुलींचा चांगला सांभाळ कर असे सांगणाऱ्या सासऱ्यावर जावयाने लाकडी दांडक्याने मारहाण व शिवीगाळ करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान या सासऱ्याचा मृत्यू झाला आहे.

मारहाण झालेल्या सासऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू; फरार जावयावर हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल
हडपसर : मुलींचा चांगला सांभाळ कर असे सांगणाऱ्या सासऱ्यावर जावयाने लाकडी दांडक्याने मारहाण व शिवीगाळ करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान या सासऱ्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना २९ डिसेंबरला सायंकाळी नऊच्या सुमारास वैदवाडी येथे घडली होती.
काल (दि. १८) मृत विठ्ठल आबाजी जाधव (वय ६०) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. या प्रकरणी राजेंद्र दादाराव शिंदे (वय ३५) या फरार आरोपींचा शोध हडपसर पोलीस घेत आहेत. याप्रकरणी पार्वती उत्तम जाधव यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी जाधव व आरोपी शिंदे वैदुवाडी गोसावी वस्ती परिसरात जवळच राहतात. आरोपी शिंदे हा फिर्यादी जाधव यांच्या मुलीचा सांभाळ करत नव्हता. त्याला दारूचे व्यसन होते. सांभाळ करण्यासाठी समजून सांगण्यासाठी गेलेल्या सासऱ्यावर जावई शिंदे यांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत सासरे गंभीर जखमी झाले. या वेळी सासूलाही मारहाण करण्यात आली. उपचारादरम्यान सासरे जाधव यांचे निधन झाले आहे.
या प्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपी राजेंद्र शिंदे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हडपसर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देशमुख अधिक तपास करीत आहेत.