तीन मजली इमारतीवरून पडून मृत्यू ; आत्महत्येचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 04:18 PM2020-03-26T16:18:12+5:302020-03-26T16:41:51+5:30
राजेंद्र शिंगाडे हे सीएमई येथे वायरमन म्हणून काम करत होते. गेल्या काही दिवसांपासून ते घरीच होते. पत्नी व मुलासह ते दिघी येथे वास्तव्यास होते. बुधवारी त्यांचे घरी वादविवाद झाले होते. रागातून त्यांनी मी परत येणार नाही असे म्हणून निघून गेले होते.
पुणे - दिघीत एका तीन मजली इमारतीवरून उडी मारून एकाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. राजेंद्र लक्ष्मण शिगांडे (वय 49,रा.राघव मंगल कार्यालया जवळ, गायकवाडनगर ,दिघी) यांनी आत्महत्या केल्याचा संशय आहे.
दिघी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विवेक लावंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास गायकवाड नगर दिघी येथे एका इमारतीखाली एक इसम गंभीर जखमी अवस्थेत पडला असल्याची माहिती नियंत्रण कक्षाकडून मिळाली होती. रात्र गस्तीवरील अधिकारी पोलिस उपनिरीक्षक आर.के.घिगे यांनी स्टाफ सह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. याठिकाणी एक इसम गंभीर जखमी अवस्थेत पडलेला होता. उपचारासाठी त्याला वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
अधिक तपासात समजले की, राजेंद्र शिंगाडे हे सीएमई येथे वायरमन म्हणून काम करत होते. गेल्या काही दिवसांपासून ते घरीच होते. पत्नी व मुलासह ते दिघी येथे वास्तव्यास होते. बुधवारी त्यांचे घरी वादविवाद झाले होते. रागातून त्यांनी मी परत येणार नाही असे म्हणून निघून गेले होते. गुरुवारी पहाटे गंभीर जखमी अवस्थेत ते त्यांच्या राहत्या घराच्या इमारती खाली पडलेले दिसले. याप्रकरणी शवविच्छेदन झाल्यानंतर अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात येणार असून ही नेमकी आत्महत्या आहे का? याबाबत देखील तपास करून पुढील कायदेशीर कारवाईची तजवीज ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक विवेक लावंड यांनी दिली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक आर.के.घिगे करीत आहेत.