अवसरी येथे होरपळून मृत्यूमुखी पडलेल्या बिबट्यांची आई जेरबंद ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 08:27 PM2019-04-04T20:27:47+5:302019-04-04T20:30:49+5:30
अवसरी बुद्रुक गावातील गुणगे-शेटे मळा येथे ऊसाच्या शेताला लावलेल्या आगीत पाच बछड्यांचा होरपळून मृत्यु झाला होता.
अवसरी : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील अवसरी बुद्रुक -गावडेवाडी येथे बिबट्याची मादी जेरबंद करण्यात वनखात्याला गुरुवारी (दि.४) यश आले. बुधवारी आगीत होरपळून मृत्यूमुखी पडलेल्या पाच बछड्यांची ही आई असावी असा अंदाज मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रज्योत पालवे यांनी व्यक्त केला. या परिसरातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
आंबेगाव तालुक्यात बिबट्यांची मोठी संख्या आहे. सध्या उसतोड सुरू असल्याने बिबट्याचा अधिवास कमी होत आहे. यामुळे बिबट्या आणि मानवाचा संघर्ष वाढू लागला आहे. मंगळवारी निगगुडसर येथे एका बिबट्याने शेतक-यावर हल्ला केल्या होता. ही घटना ताजी असतांनाच बुधवारी अवसरी बुद्रुक गावातील गुणगे-शेटे मळा येथे ऊसाच्या शेताला लावलेल्या आगीत पाच बछड्यांचा होरपळून मृत्यु झाला होता. या घटनेमुळे बिबट्यांची आई पिल्लांच्या मृत्युमुळे सैरभैर झाल्याने त्या परिसरात शेतक-यांनी जावु नये, असे आवाहन मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रज्योत पालवे यांनी केले होते. यामुळे या मादीला जेरबंद करण्यासाठी वनविभागामार्फेत या ठिकाणी पिंजरा बसविण्यात आला होता. या पिंज-यात पहाटे बिबट्याची मादी जेरबंद झाली. या बछड्यांचीच ही आई असावी असा अंदाज पालवे यांनी व्यक्त केला आहे. या मादीची वैद्यकीय तपासणी करून तिला पुन्हा तिच्या अधिवासात सोडून देण्यात आले.