पुरंदर तालुक्यात नातवाला वाचवताना आजोबांचा विहिरीत पडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 19:51 IST2019-05-16T19:50:28+5:302019-05-16T19:51:34+5:30
विहिरीचा पंप चालू करताना नातू ओमराज पाय घसरून विहिरीत पडला..

पुरंदर तालुक्यात नातवाला वाचवताना आजोबांचा विहिरीत पडून मृत्यू
पुणे (भुलेश्वर) : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस येथे नातवाला वाचवताना आजोबाचा मृत्यू झाला. मारुती गेणबा गायकवाड (वय ६२) असे मृत्युमुखी पडलेल्या वृद्धाचे नाव आहे.
शेतातील विहिरीचे पाणी उपसण्यासाठी मारुती गायकवाड व त्यांचा नातू ओमराज संदीप शिंदे हे गुरुवारी सकाळी विहिरीवर गेले. विहिरीचा पंप चालू करताना नातू ओमराज पाय घसरून विहिरीत पडला. नातवाला पोहायला येत नसल्याने त्याला वाचविण्यासाठी आजोबादेखील विहिरीत उतरले. नातवाला कसेबसे विहिरीच्या कडेला आणण्यात त्यांना यश आले. मात्र, मारुती गायकवाड हे विहिरीच्या तळाला गेले ते वर आलेच नाहीत. कपारीला बसलेला नातू विहिरीच्या बाहेर येण्यासाठी आवाज देत होता. हा आवाज रस्त्यावरून चाललेले रंगनाथ गायकवाड यांनी ऐकला व वस्तीवर येऊन आवाज दिला. त्यानंतर सर्वांनी विहीरीकडे धाव घेतली. तसेच, मारुती गायकवाड यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. जेजुरी येथे शवविच्छेदन करून माळशिरस येथील त्यांच्या घरी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.