मोकाट जनावरांच्या हल्ल्यातील जखमीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2018 07:07 PM2018-10-14T19:07:09+5:302018-10-14T19:08:43+5:30
माेकाट वळूने हल्ला केल्याने गंभीर जखमी झालेल्या नागरिकाचा मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह इंदापूर नगरपालिकेसमोर ठेवला.
इंदापूर : मोकाट वळूने हल्ला केल्याने गंभीर जखमी झालेले अशोक शंकर साळुंखे (वय ६२, रा. वडार गल्ली, ता. इंदापूर) यांची तीन महिन्यांपासूनची मृत्यूशी झुंज अखेर अशस्वी ठरली. उपचारादरम्यान रविवारी त्यांचा मृत्यू झाला. नगरपालिकेने मोकाट जनावरांचा बंदोबस्त न केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत संतप्त नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह नगरपालिकेसमोर ठेवला. याप्रकरणी दोषी असलेल्या पालिकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत त्यांनी अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. याप्रकरणी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर अखेर साळुंखे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अशोक साळुंखे इंदापूर येथे पुणे-सोलापूर महामार्गाने जात होते. यावेळी मोकाट वळूने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. यामुळे ते कोमामध्ये गेले होते. डॉक्टरांनी त्यांच्यावर घरीच उपचार चालू ठेवण्यास सांगितले होते. मात्र शनिवारी रात्री त्यांची प्रकृती खालावली. त्यांचा रविवारी पहाटे ४ वाजता मृत्यू झाला. याची माहिती त्यांचे नातेवाईक किरण सुखदेव साळुंखे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात दिली. त्यांच्या मृत्यूनंतर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. संतप्त नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेत नगरपालिकेसमोर बाजारात त्यांचा मृतदेह ठेवत अंत्यसंस्कार ठेवण्यास नकार दिला. शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यास वारंवार सांगूनही नगरपालिकेने कुठल्याच उपाययोजना न केल्याने नगरपालिकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली.
नातेवाईकांच्या आक्रमक भूमिकेनंतर दुपारी ३.१० वाजता नगरपालिकेसमोर साळुंखे यांच्या नातेवाईकांची नगरसेवक भरत शहा, काँग्रेस गटनेते कैलास कदम, राष्ट्रवादी गटनेते गजानन गवळी, श्रीधर बाब्रस, अमर गाडे, सामाजिक कार्यकर्ते अनिल पवार, पांडूतात्या शिंदे, रमेश धोत्रे, अॅड. राहुल मखरे यांनी भेट दिली. तसेच याप्रकरणी कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच जनरल बॉडीची मीटिंग घेऊन भरपाई देणार असल्याचे लेखी पत्र दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
बाजारात तणावपूर्ण वातावरण
मृताच्या नातेवाईकांनी नगरपालिकेच्या निषेधार्थ व नुकसानभरपाई देण्याबाबत लेखी आश्वासन मिळावे, यासाठी नगरपालिकेसमोर मृतदेह ठेवून एकच गर्दी केली होती. त्यामुळे बाजारात नेमके काय झाले आहे? हे बाजारासाठी आलेल्या नागरिकांना कळत नव्हते. मात्र पोलीस प्रशासनाने तातडीने बाजारामध्ये बंदोबस्त लावल्याने तणाव निवळला. या घटनेमुळे काही काळ बाजारात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.