मातीच्या ढिगा-याखाली सापडून मजुराचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2019 10:02 PM2019-06-02T22:02:54+5:302019-06-02T22:03:00+5:30
बहुळ (ता. खेड) येथील खलाटे वस्तीवर विहिरीचे बांधकाम चालू असताना विहिरीवरील मातीची धडी कोसळून त्या मातीच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या मजुराचा गुदमरून मृत्यू झाला आहे.
चाकण : बहुळ (ता. खेड) येथील खलाटे वस्तीवर विहिरीचे बांधकाम चालू असताना विहिरीवरील मातीची धडी कोसळून त्या मातीच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या मजुराचा गुदमरून मृत्यू झाला आहे. विहिरीतील इतर पाच जण सुखरूप आहेत. आज रात्री उशिरा हा अपघात दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी (२ जून) सकाळी साडेअकरापूर्वी बहुळच्या खलाटे वस्ती येथील गट नं. १०८१ मधील विहिरीत घडली. नीलेश संजय कुऱ्हाडे (वय २०, रा. वढू बुद्रुक, ता. शिरूर, जि. पुणे, मूळ रा. शिवापूर, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) असे या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मजुराचे नाव आहे. याबाबतची खबर सुभाष मालसिंग खलाटे (वय ४३, रा. बहुळ, ता. खेड, जि. पुणे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, प्रमोद मेघराज चव्हाण (वय २५, रा. वढू बुद्रुक, ता. शिरूर, जि. पुणे) व त्यांचे पाच कामगार विहिरीत काम करीत असताना विहिरीच्या वरील बाजूची मातीची धडी कोसळून त्यातील निलेश कुऱ्हाडे हा कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याने गुदमरून बेशुद्ध अवस्थेत मिळून आला. त्यास चाकण ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार तपास करीत आहेत.