विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या २ तरुणांचा मृत्यू; हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 02:42 PM2024-09-19T14:42:13+5:302024-09-19T14:43:15+5:30
एकासाठी डॉक्टरांनी आटोकाट प्रयत्न केले पण दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला, तर दुसरा ससूनला आणण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले
पुणे: यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या दोन तरुणांचा (वय 27 आणि 35) मृत्यू झाला आहे. त्यांचा मृत्यू हा डीजे च्या आवाजामुळे हृदयविकाराचा झटका येऊन झाल्याची दाट शक्यता असून दोघांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन ससून ला करण्यात आले आहे आणि त्यांचा नेमका मृत्यू कशामुळे झाला याबाबत अधिक तपासणी करण्यासाठी व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.
नयन रवींद्र ढोके (वय 27, रा. औंध) आणि विशाल बल्लाळ (वय 35, रा. सांगली) असे मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. नयन हा मंगळवारी रात्री साडे अकरा च्या सुमारास विजय टॉकी जवळ निपचित पडलेला दिसला. त्याबाबत पोलिसांनी स्पीकर वरून घोषणा केली असता जवळच विजय टॉकी येथे असलेल्या डायल 108 च्या आंबूलन्स वरील डॉक्टर सौरभ बारकुले आणि आणि चालक महेश राठोड तिथे पोचले. त्यांनी नयन ला तपासले असता त्याचा श्वास बंद पडलेला होता. पोलिसांच्या मदतीने तातडीने जवळील कार्डियाक आंबूलन्स मध्ये घेऊन गेले. तेथे त्याला डॉ. बारकुले, हेल्थ कॅम्प मधील फिजिशियन डॉ. तुषार जगताप व डॉ. संदीप बुटाला यांनी सीपीआर दिला. पण त्याचा उपयोग झाला नाही.
दरम्यान त्याला डायल 108 आंबूलन्स मधून ससूनला घेऊन जात असताना डॉ. बारकुले आणि डॉ. जगताप यांनी डिफ्रिबिलेटर (हृदय सुरू करण्यासाठी शॉक देणे) पण त्याचे हृदयाचे कामकाज सुरू झाले नाही, डॉक्टरांनी त्याचा जीव वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला पण दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह ससून रुग्णालयाच्या हवाली करण्यात आला अशी माहिती डायल 108 चे जिल्हा व्यवस्थापक डॉ. प्रियंक जावळे यांनी दिली.
दरम्यान दुसरा पेशंट विशाल याला विश्रामबाग पोलिसांनी बुधवारी दुपारी दोन वाजता ससूनला आणले. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याचा आधीच मृत्यू झाल्याचे सांगितले. परंतु हा पेशंट नेमका कोठे होता, याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
दोन्ही तरुणांचे मृत्यू ससूनला आणण्याधीच झाले होते. त्यांचे शवविच्छेदन केले असून नेमका मृत्यू कशाने झाला याबाबत निश्चित निदान करण्यासाठी त्यांचा व्हिसेरा प्रयोगशाळा तपासणी करण्यासाठी राखून ठेवला आहे. - डॉ. येल्लापा जाधव, वैदयकीय अधीक्षक, ससून रुग्णालय.