डम्परच्या धडकेत कर्तव्यावर असणाऱ्या वाहतूक पोलिसाचा मृत्यू; पुणे-नाशिक महामार्गावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 12:15 PM2023-08-10T12:15:49+5:302023-08-10T12:16:45+5:30
दुचाकीवरून खाली पडल्यावर हायवा गाडीच्या चाकाखाली येऊन डोक्याला मार लागल्याने मृत्यू
चाकण : पुणे - नाशिक महामार्गावर आळंदी फाट्याजवळ भरधाव डम्परची धडक बसून वाहतूक पोलिसाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. ९ ऑगस्ट) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. ढवळे हे ‘पंचप्रण शपथ’ घेण्यासाठी कार्यालयात जात होते. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली.
योगेश गणपत ढवळे (वय ४० वर्षे, रा. ढवळेवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे) असे अपघातात ठार झालेल्या वाहतूक पोलिसाचे नाव आहे. चाकण वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार योगेश ढवळे हे पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. त्यांची नेमणूक चाकण वाहतूक विभागात होती. चाकण पोलीस वाहतूक शाखा अंतर्गत असलेल्या चाकण शहरातील माणिक चौकात ढवळे हे आज (दि. ९) सकाळी आठ वाजल्यापासून कर्तव्यावर होते. पंचप्रण शपथविधीचा कार्यक्रम चाकण वाहतूक शाखेच्या आळंदी फाटा येथील विभाग कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी ढवळे हे आपल्या दुचाकीवरून चाकण बाजूकडून जात असताना गवते वस्तीजवळील एचपी पेट्रोलपंपाच्या समोर पाठीमागून भरधाव वेगाने येत असलेल्या हायवाने पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये ढवळे हे आपल्या दुचाकीवरून खाली पडले आणि हायवा गाडीच्या चाकाखाली आल्याने डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी होऊन उपचाराआधीच गतप्राण झाले.
पोलिस हवालदार योगेश ढवळे यांच्या जाण्याने वाहतूक पोलिसांमध्ये दुःखाचे वातावरण असून, मित्र परिवाराला यामुळे धक्का बसला आहे. योगेश हे सर्वांशी मिळूनमिसळून राहणारे असे व्यक्तिमत्त्व होते. योगेश ढवळे यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. ‘पंच प्रण शपथ’ हा सोहळा देशभरातील सरकारी कार्यालयांमध्ये केंद्र सरकारच्या ‘मेरी माटी मेरा देश’ या कार्यक्रमाचा भाग म्हणून आयोजित केला जात आहे.