लग्नाच्या वाढदिवशीच हत्या; पुण्यातील गुंड शरद मोहोळचा गोळीबारात मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 04:42 PM2024-01-05T16:42:39+5:302024-01-05T16:52:48+5:30
लग्नाच्या वाढदिवस असल्याने तो मंदिरात देवदर्शनासाठी जात असताना अज्ञातांनी मोहोळवर गोळीबार केला होता
पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर पुण्यातील कोथरूड परिसरात गोळीबार करण्यात आला होता. कोथरूड परिसरातील सुतारदरा या ठिकाणी शरद मोहोळ जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आरोपींनी शरद मोहोळ यांच्या दिशेने चार गोळ्या झाडल्या. यामध्ये शरद मोहोळ गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती होती. अखेर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला. शरद मोहोळचा आज लग्नाचा वाढदिवस होता. तो मंदिरात चालला होता. त्यावेळी अज्ञातानी मोहोळवर गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळ याच्यावर कोथरूड परिसरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. गोळ्या झाल्यानंतर आरोपी पसार झाले. घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. रुग्णालय परिसरात त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.
कोण आहे शरद मोहोळ?
शरद मोहोळ पुण्यातील कुख्यात गुन्हेगार आहे. मोहोळवर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. पिंटू मारणे हत्येप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. या खटल्यात तो जामिनावर बाहेर आला आणि दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांचे त्याने अपहरण केल्या प्रकरणात त्याला पुन्हा अटक झाली. येरवडा कारागृहात शरद मोहोळने विवेक भालेराव याच्या साथीने दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागाचा आरोप असलेल्या कतील सिद्दीकीचा खून केला. या प्रकरणात शरद मोहोळला जामीन मिळाला. मात्र बाहेर आल्यानंतर त्याची गुन्हेगारी कृत्य सुरुच होती. जुलै २०२२ मध्ये त्याला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडिपार करण्यात आले होते.