दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे विजेच्या खांबावरून पडून एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 01:43 PM2019-05-18T13:43:43+5:302019-05-18T13:53:56+5:30
कुरकुंभ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक दिवसांपासून कंत्राटी पद्धतीने स्ट्रीटलाईटची कामे सुरू आहे.
कुरकुंभ : दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कंत्राट पद्धतीने देण्यात आलेल्या स्ट्रीटलाईट सुधार कामाच्या वेळेस सचिन परब (वय ३०, रा. दौंड) हा विजेच्या खांबावरून पडून गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने दौंड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. त्यानंतर काही वेळातच दौंड येथील जवळपास ५० तरुणांच्या समूहाने व्यापार पेठेत दगडफेक करून कुरकुंभ बंद केले. या दगडफेकीत कुरकुंभचे माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष सोनार हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारांसाठी बारामती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कुरकुंभ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मृत सचिन परब हा अनेक दिवसांपासून कंत्राटी पद्धतीने स्ट्रीटलाईटची कामे करीत होता. सध्या कुरकुंभ येथे पारंपरिक यात्रा-उत्सव सुरू होणार असल्यामुळे परिसरात लाईटची कामे सुरू असताना हा प्रकार घडला आहे. याबाबत पोलीस पुढील तपास करीत असून, हा अपघात नक्की कशामुळे झाला, हे पाहणे आवश्यक आहे. दरम्यान, कुरकुंभच्या यात्रा-उत्सवावर दगडफेकीचे सावट पसरले असून, ग्रामस्थांनी एकत्र येऊन कुरकुंभ चौकात निदर्शने केली व रास्ता रोको केला. त्यामुळे बºयाच कालावधीपर्यंत वातावरण तणावपूर्ण झाले होते. या वेळी दौंडचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी ग्रामस्थांना शांत करीत दोषींवर कारवाई करण्याची हमी दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय अधिकारी सचिन बारी यांनी घटनास्थळी भेट दिली.
पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी कुरकुंभ येथे झालेल्या प्रकाराने शनिवार, रविवारी असणाऱ्या यात्रेच्या उत्सवावर भीतीचे सावट पसरले असून पारंपरिक यात्रा-उत्सवात गालबोट लागू नये म्हणून सरपंच राहुल भोसले यांनी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी केली आहे.
माणुसकीचे दर्शन बारामतीहून दौंडकडे जात असलेले फिरोज सुलतान तांबोळी यांनी परब याला खांबावरून पडताना पाहिले व तातडीने जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला त्वरित रुग्णवाहिकेतून दौंड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
............