इंदापूर तालुक्यात रेड्याने घेतला मालकाचा बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 07:52 PM2018-09-25T19:52:00+5:302018-09-25T21:12:40+5:30
एका भूमिहीन शेतमजुरासाठी त्याच्या कुटुंबाच्या चरितार्थाचे साधनच काळ बनले...
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील (जि. पुणे) शेटफळगढे येथील एका भूमिहीन शेतमजुरासाठी त्याच्या कुटुंबाच्या चरितार्थाचे साधनच काळ बनले. या शेतमजुराचा म्हशींच्या गर्भधारणेसाठी रेतनाचा व्यवसाय होता. सोमवारी (दि.२५) देखील एका म्हशीला रेतन केल्यानंतर परतीच्या वाटेवर अचानक बिथरलेल्या रेड्याने त्याचा अक्षरश: डोक्याने, शिंगाने घुसळून या शेतमजुराचा जीव घेतला. ही घटना पाहणाऱ्यांच्या अंगाचा यावेळी थरकाप उडाला होता.
शिवाजी नामदेव परवते (वय ६०) असे या शेतमजुराचे नाव आहे. शिवाजी यांचे मूळ गाव उजनी धरण परिसरात होते. उजनी धरणाच्या निर्मितीनंतर परवते हे गेल्या १० वर्षांपासून या परिसरात वास्तव्यास होते. कुटुंबाच्या चरितार्थासाठी शेतमजुरीसह शेळी, म्हैसपालनाचा त्यांचा व्यवसाय होता. शिवाय म्हशींच्या गर्भधारणेसाठी रेतन करण्याचादेखील त्यांचा व्यवसाय होता. त्यासाठी त्यांनी रेडा पाळला होता. गेल्या १० वर्षांपासून त्यांचा व्यवसाय सुरू होता. एका रेतनासाठी त्यांना शेतकऱ्याकडून ५०० रुपये मिळत असत.
सोमवारीदेखील नेहमीप्रमाणे परबते एका शेतकऱ्याच्या घरी रेतनासाठी गेले होते. त्यानंतर रेड्यावर बसून ते घरी परत निघाले होते. मात्र, परतीच्या वाटेवर निर्मनुष्य ठिकाणी रेडा अचानक बिथरला. रेड्याने अक्षरश: पुढचे पाय जमिनीवर टेकवून परबते यांना खाली पाडले. त्यानंतर रौद्ररूप धारण केलेल्या रेड्याने परबते यांना शिंगाने, डोक्याने घोळसण्यास सुरुवात केली. सुरवातीला हा परिसर निर्मनुष्य होता. मात्र, काही वेळाने येथून मार्गस्थ होणाºया ग्रामस्थांनी हा प्रकार पाहिल. रेड्याचा रुद्रावतार पाहून या ग्रामस्थांचा थरकाप उडाला. त्यातुनदेखील मोठ्या धाडसाने ग्रामस्थांनी रेड्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त झालेल्या रेड्याने कोणाला दाद दिली नाही.
रेड्याने परबते यांना शिंगाने अक्षरश: उचलून उचलून आपटून मारले. यावेळी परबते यांच्या अंगावरील कपड्याच्या अक्षरश: चिंध्या झाल्या होत्या, असे घटना प्रत्यक्षात पाहणाऱ्या ग्रामस्थांनी सांगितले. निपचित पडल्यानंतरदेखील रेडा परबते यांना सोडण्यास तयार नव्हता. या दरम्यान, परबते यांच्या नातेवाईकांनी टेम्पोच्या साह्याने रेड्याला बाजुला करण्याचा प्रयत्न केला. तसेच, दगड, काठीने त्याला हुसकावले. त्यानंतर तेथील एका झाडाला रेड्याला बांधण्यात ग्रामस्थांना यश आले. रेड्याला बांधल्यानंतरच गावकऱ्यांचा जीव भांड्यात पडला. परबते यांना तातडीने उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, वाटेतच उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.
====
...या काळात अडथळा निर्माण झाल्यास
या घटनेबाबत बारामती तालुका पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. आर. एल. ओव्हाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की ,रेडा हा खूप ताकतवान असतो. तसेच खूप रागीटदेखील असतो. रेतनाच्या काळात तो अधिक उत्तेजित असतो. या काळात अडथळा निर्माण झाल्यास, अशी घटना घडण्याची शक्यता असते, असे डॉ. ओव्हाळ यांनी सांगितले.
=====
...त्याकडे दुर्लक्ष केले
घटना घडण्यापूर्वी शेतकऱ्याच्या म्हशीला रेतन करून आल्यानंतर वाटेत शिवाजी परबते यांनी रेड्याला झाडाला बांधले. या दरम्यान, पलीकडे बांधलेल्या म्हशीकडे रेडा ओढ घेत होता. रेड्याने लावलेल्या जोरामुळे या झाडाची साल निघुन गेली. यावेळी रेडा काही काळ बिथरला देखील होता. मात्र, परबते यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्याला नेहमीप्रमाणे घरी घेऊन निघाले होते. मात्र, नियतीला ते मान्य नव्हते. अखेर कुटुंबाच्या चरितार्थासाठी पाळलेला रेडाच त्यांच्यासाठी काळ बनून आला.