कालव्यात बुडणाऱ्या मुलाला वाचविताना आई वडिलांचा दुर्दैवी मृत्यू, हवेली तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 06:14 PM2020-05-16T18:14:17+5:302020-05-16T18:18:36+5:30
पाण्याजवळ खेळत असताना रणजित अचानक पाण्यात पडला.
लोणी काळभोर : कालव्यात बुडत असलेल्या मुलाला वाचवण्यासाठी आई - वडील पाण्यात उतरले. परंतू दुर्दैवाने भोवऱ्यात सापडून ते दोघेही मृत्युमुखी पडल्याची घटना कुंजीरवाडी ( ता. हवेली ) येथे घडली आहे. यांमध्ये मुलगा बचावला असून त्याचे आईचा मृतदेह सापडला आहे.
या घटनेत अशोक कश्यप ( वय ४० ) व त्यांची पत्नी सोनी अशोक कश्यप ( वय ३५ दोघे सध्या रा. कुंजीरवाडी, ता. हवेली. मुळ रा. गौसगंज, जि. हरदोय, उत्तर प्रदेश ) हे मृत्युमुखी पडले आहेत.
कुंजीरवाडीचे पोलीस पाटील मिलिंद कुंजीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवार ( १६ मे ) रोजी दुपारी १ - ३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. कश्यप पती - पत्नी हे आपल्या चार मुलांसमवेत राहतात. गेल्या चार महिने पासून दोघे नर्सरीमध्ये मजूरीकाम करून कुटुंब चालवत होते. दुपारी काम झाल्यानंतर ते दोघे आणि मोठा मुलगा रणजित ( वय ७) याच्यासह नवीन मुठा उजव्या कालव्यात कपडे धुण्यासाठी आले होते.
पाण्याजवळ खेळत असताना रणजित अचानक पाण्यात पडला. मुलगा वाहून जात आहे हे लक्षात आल्यानंतर तर सोनी यांनी पाण्यात उडी मारली. येथून काही अंतरावर पाणी जास्त प्रवाहाने पुढे जावे यांसाठी कालव्याचे दोन्ही बाजूला अर्धगोल भिंत बांधण्यात आली आहे. त्यामुळे तेथे पाण्यात भोवरे तयार होतात. मुलगा व पत्नी पिचिंगच्या पुढे भोवऱ्यानजीक जात आहेत हे पाहून अशोक यानी पाण्यात उडी मारली. काही क्षणातच अशोक कश्यप त्या ठिकाणी पोहोचले. परंतू दुर्दैवाने तेही भोवऱ्यात सापडले व पाण्याखाली गेले. थोड्या वेळाने सोनी यांना दोरी टाकून पाण्याबाहेर घेण्यात आले. परंतू तत्पूर्वी त्यांचे निधन झाले होते. सायंकाळी उशिरापर्यंत अशोक यांचा शोध घेण्याचे काम सुरू होते. कोरोनाचा प्रभाव वाढत आहे हे पाहून अशोक कश्यप हे आपल्या मुळ गावी परतण्यासाठी प्रयत्न करत होते. परंतू तत्पूर्वीच पती - पत्नी दोघांचे निधन झाले.