गरिबांचे मरण स्वस्त, राजेश टोपे खुर्ची सोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:09 AM2021-01-10T04:09:11+5:302021-01-10T04:09:11+5:30
उमेश चव्हाण : रुग्ण हक्क परिषदेची मागणी मुख्यमंत्र्यांना निवेदन : रुग्ण हक्क परिषदेची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ...
उमेश चव्हाण : रुग्ण हक्क परिषदेची मागणी
मुख्यमंत्र्यांना निवेदन : रुग्ण हक्क परिषदेची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “भंडारा जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय हे गरीब आणि दुर्गम भागातून येणाऱ्या रुग्णांसाठी आधारवड आहे. उपचारा दरम्यान आग लागल्याने नाजूक बालकांचा होरपळून मृत्यू झाला. आरोग्यमंत्री म्हणून शासकीय रुग्णालय आणि यंत्रणांचे पितळ कोरोनाच्या काळात उघडे पडलेच होते. या दुर्दैवी घटनेने सरकारी रुग्णालयांवरील विश्वास उडाला असल्याची लोकांची भावना झाली आहे. या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे,” अशी आग्रही मागणी रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केली.
गरीब आणि दुर्गम भागातील लोकांचे मरण स्वस्त आहे, गर्भश्रीमंत राजकारणी- उद्योगपतींच्या बाबतीत दुर्दैवाने तरी अशी घटना घडेल का? सामान्य आणि गरिबांना खासगी हॉस्पिटलमधील पंचतारांकित उपचार परवडणारे नाहीत. म्हणून दर वेळी मृत्यूची परीक्षा द्यायची का? इमारतीचे आणि आगीचे कागदोपत्री ऑडिट आणि मेंटेनन्सच्या नावाखाली सुरू असणारा भ्रष्टाचारामुळे नवजात पाखरे दगावली, असा आरोप रुग्ण हक्क परिषदेने केला आहे.
सरकारच्या पाच लाख रुपयांच्या मदतीने गेलेले जीव परत येणार आहेत का? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राज्यपाल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्याचे चव्हाण म्हणाले.