उपचाराअभावी गरोदर महिलेचा मृत्यू

By admin | Published: May 28, 2015 11:17 PM2015-05-28T23:17:47+5:302015-05-28T23:17:47+5:30

माझगाव डोफेखिंड (ता. वेल्हे) येथील गरोदर महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची घटना आज घडली. या घटनेने संंपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Death of pregnant woman without treatment | उपचाराअभावी गरोदर महिलेचा मृत्यू

उपचाराअभावी गरोदर महिलेचा मृत्यू

Next

पुणे : माझगाव डोफेखिंड (ता. वेल्हे) येथील गरोदर महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची घटना आज घडली. या घटनेने संंपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या निमित्ताने पासली आरोग्य केंद्रातील सेवांबाबतचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे, की माझगाव-डोफेखिंड येथील अनिता सुरेश कचरे (वय २३) या महिलेच्या पोटात आज पहाटे दुखू लागल्याने तिच्या पतीने दवाखान्यात नेण्यासाठी गाडी बोलावली. परंतु वाहन येण्यास विलंब लागल्याने महिलेची घरीच प्रसूती झाली. प्रसूतीदरम्यान अतिरक्तस्राव झाल्याने महिला
बेशुद्ध पडली.
या अवस्थेमध्ये या महिलेला जवळच दोन-तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या पासली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले असता, येथे एकही वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेविका उपस्थित नसल्याने या महिलेला पासली येथून वेल्हा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. पासली ते वेल्हा हे अंतर १२ किलोमीटर व घाटमाथ्याचे असल्याने वेल्हा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये येण्यास उशीर झाला. ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. एम. बी. परदेशी यांनी तपासणी केल्यानंतर ही माता मृत झाल्याचे घोषित केले तर जन्मलेल्या बाळाला ग्रामीण रुग्णालयात दाखल करुन घेतले.
या घटनेनंतर माजी सभापती चतुरा नगिने यांच्यासह पत्रकारांनी पासली दवाखान्याला भेट दिली असता, या दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी सोडून चौदा कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी एकच फार्मासिस्ट या दवाखान्यामध्ये उपस्थित होता.
मयत झालेली माता ही नऊ महिन्यांपासून पासली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार घेत होती अशी नोंदी येथील रजिस्ट्ररला आढळली. महिलेला १७ मे ही प्रसूतीची तारीख दिली होती; मात्र ही महिला दवाखान्यामध्ये दाखल झाली नव्हती. अठरागाव मावळ परिसर हा दुर्गम असून, येथे अशिक्षित वर्ग मोठ्या प्रमाणात असून, वाड्या-वस्त्यांवर धनगर समाज जास्त आहे. या भागातील लोकांना सेवा देण्यासाठी लाखो रुपये खर्च शासनाकडून आरोग्य सेवांवर केला जातो. आरोग्यसेवा देण्यासाठी नेमलेल्या आरोग्यसेविका संबंधित गावामध्ये फिरकल्याच नाहीत, तर गरोदर मातांबाबतचा कोणताही पाठपुरावा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून झालेला दिसला नाही.
दुर्गम अशा पासली भागामध्ये माता-मृत्यूच्या एका वर्षात तीन घटना घडल्याची माहितीही या वेळी पुढे आली. लाखो रुपये खर्च शासनाकडून कर्मचारी व आरोग्यव्यवस्थेसाठी केला जातो. अठरागाव मावळ परिसराला संजीवनी ठरावी यासाठी उभी केलेली पासली आरोग्य केंद्राची इंडो-जर्मन पद्धतीची इमारत ही फक्त येथील कर्मचाऱ्यांना पगार मिळण्यासाठीच उभी केली आहे काय? असा प्रश्न येथील जनतेला निर्माण झाला आहे. (वार्ताहर)

नियमानुसार गरोदर महिलेला तिच्या प्रसूती तारखेच्या सात दिवस अगोदर दवाखान्यात अ‍ॅडमिट करावे लागते. त्यासाठी आरोग्यसेविकांनी गरोदर मातांकडे पाठपुरावा करणे गरजेचे
असते. मात्र, या घटनेमध्ये आरोग्यसेविका मोहिते व वैद्यकीय अधिकारी सोनवणे यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसते. याबाबत चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
- डॉ. माने
तालुका वैद्यकीय अधिकारी

दवाखाना सुसज्ज; मात्र अधिकारी गायब
४वेल्ह्याच्या व तोरणा किल्ल्याच्या पश्चिमेस अठरागाव मावळ परिसराची इतिहासात नोंद आहे. या अठरागाव मावळ परिसरामध्ये पासली (ता. वेल्हा) येथे इंडो-जर्मन पद्धतीने सुसज्ज असा दवाखाना बांधलेला आहे, तर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना राहण्यासाठी कॉटर्स उपलब्ध आहेत. परंतु परंपरेनुसार येथे आठवड्यातून एकदाच वैद्यकीय अधिकारी उपस्थित असल्याची माहिती येथील ग्रामस्थांनी दिली. वैद्यकीय अधिकारीच उपस्थित नसल्याने येथील स्त्री-पुरुष, पर्यवेक्षक, आरोग्य सेवक-सेविका, लॅब टेक्निशिअन, शिपाई हे मनाचे राजे आहेत.

अनेक गावे पासली आरोग्य केंद्रावर आरोग्य सेवांबाबत अवलंबून आहेत. परंपरेनुसार येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्याने रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. प्रशासनाची उदासीनता स्पष्ट जाणवते.
- डॉ. जितेंद्र जाधव, रुग्ण कल्याण समिती सदस्य

...तर ती वाचली असती
माझ्या पत्नीस जर पासली आरोग्य केंद्रात उपचार मिळाले असते तर ती वाचली असती, असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेची पती सुरेश कचरे यांनी सांगितले.

 

Web Title: Death of pregnant woman without treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.