स्वाइन फ्लूसदृश आजाराने शिक्षिकेचा मृत्यू
By admin | Published: June 26, 2017 03:42 AM2017-06-26T03:42:23+5:302017-06-26T03:42:23+5:30
स्वाइन फ्लूसदृश आजाराने येथील एका शिक्षिकेचा मृत्यू झाला. गेल्या महिनाभरात स्वाइन फ्लूसदृश तीन रुग्ण मिळाले. यात एका रुग्णाला
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर : स्वाइन फ्लूसदृश आजाराने येथील एका शिक्षिकेचा मृत्यू झाला. गेल्या महिनाभरात स्वाइन फ्लूसदृश तीन रुग्ण मिळाले. यात एका रुग्णाला स्वाइन फ्लू झाल्याचा अहवाल तपासणीत समोर आला आहे. याचा अर्थ शहरात स्वाइन फ्लूसदृश साथ असण्याची शक्यता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
पल्लवी दिलीप कुलकर्णी (वय ३५, छत्रपती कॉलनी, शिरूर) असे मृत महिलेचे नाव आहे. कुलकर्णी यांना काल दुपारी येथील धारिवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने व स्वाइन फ्लूूसदृश लक्षणे आढळल्याने त्यांना पुणे येथे पाठवण्यात आले. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना केईएम रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांना टॅमी फ्लूचे औषध तसेच इतर उपचार सुरू करण्यात आले. मात्र पहाटे पाचला त्यांचा मृत्यू झाला. मागील पंधरा दिवसांत शहरात दोन स्वाइन फ्लूसदृश रुग्ण आढळून आले. या रुग्णांना ताबडतोब उपचार सुरू केल्याचे डॉ. संतोष पोटे यांनी सांगितले. हे दोन्ही रुग्ण बरे झालेत.
मागील महिन्यात येथील बालरोगतज्ज्ञ संदीप गुंड यांच्याकडे तीन वर्षांचे बाळ उपचारासाठी आणण्यात आले. त्याला स्वाइन फ्लूूसदृश लक्षणे आढळल्याने केईएम रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे बाळाच्या घशातील द्रव तपासणीसाठी एनआयव्हीला पाठवण्यात आला. यात तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. असे अनेक रुग्ण आढळले.
मात्र आम्ही तपासणी अहवालाची वाट न पाहता रुग्णावर उपचार सुरू करतो, असे डॉ. गुंड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.