रुग्णालयात तून परतलेल्या कोरोनाबाधितांचे घरात मृत्यू होण्याचे प्रमाण वाढतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:11 AM2021-04-20T04:11:32+5:302021-04-20T04:11:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनामुक्त झाले म्हणून घरी परतलेल्या, तथा गंभीर प्रकृतीतून सुधारणा झालेल्या कोरोनाबाधितांना घरी आणल्यावर पुढील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनामुक्त झाले म्हणून घरी परतलेल्या, तथा गंभीर प्रकृतीतून सुधारणा झालेल्या कोरोनाबाधितांना घरी आणल्यावर पुढील तीन-चार दिवसात त्यांचे मृत्यू होण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसात वाढत असल्याचे दिसून आले आहे़ शहरात पांडवगनर, कोरेगाव पार्क येथे गेल्या तीन दिवसात असे प्रकार घडले असून, घरी आणलेल्या तीन कोरोनाबाधितांचे मृत्यू गेल्या तीन दिवसात झाल्याची नोंद क्षेत्रिय कार्यालयांकडे घेण्यात आली आहे़
शहरात दिवसाकाठी पाच हजाराच्या पुढेच कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी, रूग्णालयांमध्ये जागा मिळाली नाही म्हणून, घरातच असलेल्या रूग्णाचा मृत्यू झाला असा प्रकार शहरात अद्याप तरी नोंदविला गेलेला नाही़ मात्र रूग्णालयात दाखल झाला होता परंतु, प्रकृतीत सुधारणा झाली म्हणून घरी परतला आणि मृत्यू झाला़ तसेच पॅरालिसिस् सारख्या आजारामुळे अंथरूणास खिळून राहणारे रूग्ण़ याचबरोबर रूग्णालयात गंभीर अवस्थेतून बाहेर आल्यावर घरी परतल्यावर पुढील चार ते पाच दिवसात मृत्यू झाला असे प्रकार शहरात कोरोनाच्या दुसºया लाटेत घडल्याचे दिसून आले आहे़ फेब्रुवारी, २०२१ पासून आत्तापर्यंत शहरात एकूण कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूपैकी ३५ ते ४० मृत्यू अशारितीने घरीच झाल्याची नोंद आहे़
-----------------------
चौकट :-
शहरातील कोरोनाबाधितांची परिस्थिती (१८ एप्रिल रोजी सायंकाळी ६ पर्यंत)
९ मार्च,२०२० ते आत्तापर्यंतचे एकूण रूग्ण : ३ लाख ६७ हजार २३७
बरे झालेले रूग्ण : ३ लाख ४ हजार ४९२
आजमितीला एकूण सक्रिय रूग्ण - ५६ हजार ६३६
गृहविलगीकरणातील रूग्ण - सुमारे ४७ हजार ५००
--------------------
कोट :-
रूग्णालयातून उपचार घेऊन घरी परतलेल्या, होम आयसोलेशनमध्ये असलेल्या व अंथरूणास खिळून असलेल्या कोरोनाबाधितांचा घरी मृत्यू होण्याच्या घटना शहरात घडल्या आहेत़ यामध्ये सर्वाधिक मृत्यू हे वयस्कर व्यक्तींचे तथा अन्य आजार असलेल्यांचेच झाले आहेत़
डॉ. कल्पना बळीवंत
सहाय्यक आरोग्य अधिकारी पुणे मनपा़
------------------------------