Pune: सोळू स्फोटातील मृत्यूंचा आकडा चारवर; आज एका महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 12:44 PM2024-02-10T12:44:11+5:302024-02-10T12:44:55+5:30

स्फोटात ३ जणांचा मृत्यू झाला असून तर १९ जण भाजून जखमी झाले आहे

Death toll in Solu blast rises to four A woman died today | Pune: सोळू स्फोटातील मृत्यूंचा आकडा चारवर; आज एका महिलेचा मृत्यू

Pune: सोळू स्फोटातील मृत्यूंचा आकडा चारवर; आज एका महिलेचा मृत्यू

आळंदी : आळंदी जवळ असलेल्या सोळू गावात एल्युमिनियम प्लेट बनवणाऱ्या कंपनीत गुरुवारी (दि. ८) सायंकाळी भीषण स्फोट झाला होता. प्राथमिक माहितीमध्ये एक - दोन जणांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले होते. तर १९ जण जखमी झाले होते. दरम्यान घटनेच्या दुसऱ्या दिवशी जखमी असलेल्या ८१ वर्षीय आजोबांचा मृत्यू झाला. तर आज (दि.१०) पुण्यात खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. नंदा संतोष शेळके (रा. पिंपळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. स्फोटात आजपर्यंत चार निष्पाप जीव गेले असून आणखी एक - दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
               
 सोळू ते खटकाळे रस्त्यावर माळवाडी येथे स्पेसिफिक अलॉय प्रा ली ही कंपनी आहे. ही कंपनी मागील चार वर्षांपासून बंद आहे. कंपनी बंद असताना देखील कंपनीमध्ये एल्युमिनियम इंगोट ही वस्तू बनविण्यासाठी आणलेला स्फोटक कच्चा माल कंपनीत साठवून ठेवण्यात आला होता. त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली नव्हती. मात्र गुरुवारी सायंकाळी या कच्चा मालाला आग लागली आणि मोठा स्फोट झाला. या स्फोटाची दाहकता खूप असल्याने एक - दोन जणांचा मृत्यू झाला. तर १९ जण भाजून जखमी झाले. स्फोटाच्या आवाजाने आजूबाजूच्या घरांना तडे गेले. काही घरांचे मोठे नुकसान झाले. कंपनीच्या बाजूला असलेल्या गोठ्यात बांधलेली जनावरे देखील भाजली गेली. तर त्याठिकाणी पार्किंग केलेल्या नऊ दुचाकी  वाहने जळून खाक झाली.
 
स्फोटात आत्तापर्यंत रामचंद्र मारुती निंबाळकर (वय ८१), संतोष त्रंबक माने (दोघे रा. सोळू), नवनाथ पोतंना पांचाळ (वय ५५) व नंदा संतोष शेळके (वय ४०) मृत पावले आहेत. नंदा शेळके या पालेभाज्यांच्या दुकानात भाजी खरेदी करत होत्या. दरम्यान अचानक झालेल्या स्फोटाच्या ज्वाळा त्यांच्या अंगावर पडल्याने त्या जखमी झाल्या होत्या. सुमारे ७० ते ८० टक्के शरीर भाजले गेले होते. पुण्यातील खाजगी सुर्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र शनिवारी (दि.१०) उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Death toll in Solu blast rises to four A woman died today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.