अंत्यविधी करुन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला , दोन जणांचा मृत्यू; चार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 07:10 PM2018-04-17T19:10:01+5:302018-04-17T19:10:01+5:30
नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी कारने डिस्कळ येथे गेले होते. ते मध्यरात्री गावी परतत असताना धुमाळ कुटुंबियांची गाडी पालखी तळाजवळील ओढ्याच्या कठड्याला धडकली.
नीरा ( पुरंदर ) : डिस्कळ येथील नातेवाईकाच्या अंत्यविधीवरुन माघारी येताना कारने ओढ्याच्या कठड्याला जबर धडक दिली. या भीषण अपघातात दोघे जण मृत्यूमुखी पडले. हा अपघात फलटण-लोणंद रस्त्यावर पालखी तळाजवळील भोवर ओढ्याच्या पुलावर पहाटे दोनच्या सुमारास झाला. मृत व्यक्ती नीरा व जेऊर येथील आहेत. या अपघातात चार जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी लोणंद येथील रुग्णालयात दाखल केले आहे.
गाडीचे चालक संजय शिवाजी धुमाळ (वय ४३, रा. मांडकी ता. पुरंदर) व शोभा नंदकुमार धुमाळ (४५, सध्या नीरा मूळ रा. पाडेगाव ता. फलटण) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींचे नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, धुमाळ कुटुंबीय नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी कार (एमएच-१२. एचझेड. ७७२७) ने डिस्कळ येथे गेले होते. ते मध्यरात्री गावी परतत असताना त्यांची गाडी पालखी तळाजवळील कठड्याला धडकली. यामध्ये चालक संजय धुमाळ व शोभा धुमाळ हे ठार झाले. तर सारिका संजय धुमाळ,कमल दगडू धुमाळ व अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर लोणंद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संजय धुमाळ हे पुरंदर नागरी पतसंस्थेच्या नीरा शाखेचे शाखाधिकारी म्हणून कार्यरत होते.