पुणे बॉम्बस्फोटातील फरारी दोन दहशतवाद्यांचा खात्मा
By admin | Published: April 5, 2015 01:47 AM2015-04-05T01:47:20+5:302015-04-05T01:47:20+5:30
मध्य प्रदेशातील खांडवा कारागृह फोडून पळालेले व फरासखाना बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या पाच दहशतवाद्यांपैकी दोघांचा आंध्र प्रदेशात पोलीस चकमकीत खात्मा झाला.
पुणे : मध्य प्रदेशातील खांडवा कारागृह फोडून पळालेले व फरासखाना बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या पाच दहशतवाद्यांपैकी दोघांचा आंध्र प्रदेशात पोलीस चकमकीत खात्मा झाला. त्यात ‘मास्टरमाइंड’ मोहम्मद एजाजुद्दीनचा समावेश आहे.
संबंधित दहशतवादी हैद्राबादमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याच्या तयारीत होते, अशी यंत्रणांची माहिती आहे. १० जुलै २०१४ रोजी फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी हे पाच दहशतवादी मुख्य संशयीत आहेत.
आंध्र प्रदेश पोलिसांसोबत नालगोंडा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत मोहम्मद एजाजुद्दीन उर्फ एजाज उर्फ रियाज उर्फ राहुल (३२) आणि मोहम्मद अस्लम अयुब खान (२८) यांना पोलिसांनी कंठस्नान घातले. तत्पूर्वी हैदराबादमध्ये गुरुवारी नाकाबंदीमध्ये संशयीत वाहनांची तपासणी करताना अस्लम आणि एजाजुद्दीनने पोलिसांची कार्बाईन हिसकावून त्यांच्यावरच गोळीबार केला. त्यामध्ये होमगार्ड महेश शहीद झाले तर पोलीस निरीक्षक वाय. मोगलीह जखमी झाले होते. शनिवारी सकाळी नलगोंडामधील जानकीपुरम भागात अस्लम आणि एजाज यांनी गोळीबार केला. त्यात पोलीस शिपाई नागराजे शहीद झाले. पोलिसांनी प्रत्त्युतरादाखल केलेल्या गोळीबारात अस्लम आणि एजाजुद्दीन ठार झाले.