चारित्र्यावरील संशयामुळे पत्नीचा खून करुन पतीची आत्महत्या, पुण्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2017 06:42 PM2017-12-17T18:42:47+5:302017-12-17T19:14:31+5:30
त्याने आपल्या पत्नीचा गळा आवळून खून करून स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचा लहान मुलगा सकाळी पेपर टाकण्याचे काम करून घरी आल्यानंतर...
पुणे : बिबवेवाडी येथील राजीव गांधीनगरमधील रामदास दशरथ चालेकर (वय ३७) याने पत्नी सारीका रामदास चालेकर हिचा गळा आवळून खून करून स्वत:ला घरामधील सिलिंगच्या लोखंडी अँगलला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामदास याचा पत्नीच्या चारित्र्यावरील संशयामुळे त्यांच्याच वारंवार भांडण होत होते. दरम्यान या कारणावरून शनिवारी सायंकाळी सहापासून कडाक्याचे भांडण सुरु होते. रात्री त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यावेळी रोहितही तेथेच होता. याबाबत सारिकाने तिच्या आईला सांगितल्यानंतर तिची आई घरी आली. त्यांनी दोघांतील भांडण मिटविण्याचा प्रयत्न केला आणि रात्री एक वाजता निघून गेल्या.
मात्र तरीही दोघांत कुरबुर सुरु होती. त्यानंतर रोहित व सारिका वरच्या माळ्यावरील खोलीत झोपले. तर रामदास तळमजल्यावरील खोलीत जाऊन झोपला. पहाटे साडेचार वाजता रोहित पेपर टाकण्यासाठी घरातून बाहेर पडला. आई झोपलेली आहे. असे समजून जाताना त्याने वडीलांना सांगितले. त्यानंतर रामदास याने आपल्या पत्नीचा गळा आवळून खून करून स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचा लहान मुलगा सकाळी पेपर टाकण्याचे काम करून घरी आल्यानंतर आई व वडील घराचा दरवाजा उघडत नाही म्हणून दाराच्या फटीतून बघितले असता, त्याला वडिलांनी गळफास घेतल्याचे दिसून आले़ त्यानंतर त्याने शेजारील लोकांना मदतीला बोलवून घटना सांगितली, स्थानिकांनी तात्काळ घराचा दारवाजा तोडून पाहिले असता सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर तात्काळ बिबवेवाडी पोलिस ठाण्यात कळवले. बिबवेवाडीचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब कोपणार यांनी घटनेची माहीती घेऊन दोन्ही मृतदेह ससून रूग्णालयात उतरीय तपासणीसाठी पाठविले आहेत.
चालेकर जोडप्याला दोन मुले असून त्यातील रितिक (वय १७) हा शाहू कॉलेज मध्ये ११वी मध्ये शिकत आहे़ पुणे अमेचुअर संघटनेकडून तो कब्बडी खेळत असल्याने आपल्या आजीकडे सदाशिव पेठेत राहत असतो़ रोहित (वय १५) हा बाहेरुन दहावीची परिक्षा देत असून सकाळी पेपर टाकण्याचे काम करतो. मृत रामदास चालेकर, हा जोशी हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉय म्हणून तर मृत सारिका चालेकर प्रयाग हॉस्पिटलमध्ये आयाचे काम करित होती. या घटनेमुळे राजीव गांधीनगर परिसरात शोककळा पसरली. सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार व वरिष्ठ निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट दिली.