शिरूरमध्ये डेंगीमुळे महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 05:50 AM2017-09-01T05:50:43+5:302017-09-01T05:50:48+5:30
येथील सुनीता मुकुंद फटांगरे (वय ४२) या महिलेचा डेंगीने पुणे येथे मृत्यू झाला. शहरात डेंगीची साथ पसरली असून तालुका आरोग्य विभागाच्या माहितीनुसार शहरात ५० डेंगीसदृश तर ५ रुग्ण डेंगी पॉझिटीव्ह आढळले आहेत
शिरूर : येथील सुनीता मुकुंद फटांगरे (वय ४२) या महिलेचा डेंगीने पुणे येथे मृत्यू झाला. शहरात डेंगीची साथ पसरली असून तालुका आरोग्य विभागाच्या माहितीनुसार शहरात ५० डेंगीसदृश तर ५ रुग्ण डेंगी पॉझिटीव्ह आढळले आहेत. या महिलेच्या मृत्यूमुळे नगर परिषद प्रशासन व तालुका आरोग्य विभाग खडबडून जागे झाले असून उद्यापासून साथ आटोक्यात आणण्यासाठी धडक उपाययोजना सुरू करण्याच्या तयारीत आहेत.
फटांगरे या चारदिवसांपूर्वी येथील खासगी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यांची डेंगीची प्राथमिक तपासणी केली असता त्यांना डेंगीसदृश लक्षणे आढळली. यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र, सोमवारी त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याचे आढळून आल्यावर त्यांना पुण्यातील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरुवारी पहाटे ६ वाजता त्यांचा मृत्यू झाला. केईएम रुग्णालयाने फटांगरे यांची डेंगीची (आयजीजी, आयजीएच) ही तपासणी केली असता ती पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. गेली पंधवड्यापासून शहरात डेंगीसदृश आजाराची साथ पसरली आहे. नगरपरिषदेने सुरुवातीला याकडे हवे तेवढे गांभिर्याने पाहिले नाही. गावांचा वाढता विस्तार पाहता नगरपरिषदेची कर्मचारी संख्या अपूरी पडत आहे. मलेरिया, हिवताप विभागाचे काम करणाºया तालुका आरोग्य विभागाने त्याची जबाबदारी असताना फक्त दोनच (एमपीडब्ल्यू) माणसे नगरपरिषदेला दिली. शहरातील आरोग्याचे काम आमचे नाही, असेच तालुका आरोग्य अधिकारी सांगू लागले. शहरात पसरलेल्या या परिस्थितीशी सामना करण्यासाठी या विभागाने त्यांची तालुक्यातील इतर कर्मचारी देणे अपेक्षित असताना याकडे गांभिर्याने पाहिले नाही. आपली जबाबदारी ढकलत हे काम नगरपषिदेचेच असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. साथ आटोक्यात आणायची असेल तर शहरात एकाच वेळी सर्व भागात धुरळणी व फवारणी करणे गरजेचे असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. नगरपरिषद आरोग्याला प्राधान्य देत असून तालुका आरोग्य विभागाच्या सहकार्याने साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे नगराध्यक्ष वैशाली वाखारे यांनी सांगितले. १५ दिवसांपासून नगरपरिषदेने धुरळणी, फवारणी मोहीम सुरू केली असल्याचे मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी सांगितले.