स्वाइन फ्लूमुळे महिलेचा मृत्यू
By admin | Published: February 17, 2015 01:09 AM2015-02-17T01:09:42+5:302015-02-17T01:09:42+5:30
स्वाइन फ्लूचा शहरात उद्रेक झाला असून आज एका महिलेचा या आजाराच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. संबंधित महिला उपचारासाठी रुग्णालयात उशिरा दाखल झाल्याचे पालिकेने अहवालात नमूद केले आहे.
पुणे : स्वाइन फ्लूचा शहरात उद्रेक झाला असून आज एका महिलेचा या आजाराच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. संबंधित महिला उपचारासाठी रुग्णालयात उशिरा दाखल झाल्याचे पालिकेने अहवालात नमूद केले आहे. यामुळे स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या १५ वर पोहोचली आहे. दरम्यान, आज एकाला स्वाइन फ्लूचा संसर्ग झाला. संसर्ग झालेल्या १० जणांची प्रकृती चिंतानजक असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
कोथरूड येथे राहणाऱ्या ५१ वर्षीय महिलेचा आज सायंकाळी मृत्यू झाला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल केल्यानंतर १३ फेब्रुवारीला त्यांच्या घशातील नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. १४ फेब्रुवारीला त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले होते. या महिलेला मधुमेह आणि किडीनचा आजार होता. हा आजार या काळात बळावल्याने उपचार सुरू असताना आज सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला.
दिवसभरात १ हजार ८१२ जणांची तपासणी
४आज दिवसभरात १ हजार ८१२ जणांची स्वाइन फ्लूची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३८२ संशयितांना टॅमी फ्लू औषधे देण्यात आली आहेत.
४५५ जणांच्या कफाचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. संसर्ग झालेले २५ रुग्ण रुग्णालयात दाखल असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर पूर्णत: बरे झालेल्या ८ जणांना घरी सोडण्यात आले.