नवव्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू
By admin | Published: January 11, 2017 03:43 AM2017-01-11T03:43:29+5:302017-01-11T03:43:29+5:30
पौड फाटा येथील निर्वाणा हिल्स या गृह प्रकल्पामधील सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी गेलेल्या महिलेचा ९व्या मजल्यावरून पडून जागीच मृत्यू झाला.
पुणे : पौड फाटा येथील निर्वाणा हिल्स या गृह प्रकल्पामधील सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी गेलेल्या महिलेचा ९व्या मजल्यावरून पडून जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास घडली.
अनुश्री आशुतोष पांडे (वय ५०, रा़ कपिला मल्हार सोसायटी, बावधन) असे या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुश्री पांडे या गृहिणी होत्या. त्यांना दोन मुली आहेत. त्यांच्या पतीची स्वत:ची कंपनी आहे. त्यांना नवीन फ्लॅट घ्यायचा असल्याने त्याबाबत त्यांनी शोधाशोध सुरू केली होती. कुमार पॉपर्टीजचा पौड फाटा येथे गृहप्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाबद्दल पांंडे यांनी संपर्क साधला होता. त्यांना सँपल फ्लॅट पाहण्यासाठी मंगळवारी सायंकाळी पाच वाजता बोलावले होते. सायंकाळी त्या एकट्याच सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी तेथे गेल्या. त्या वेळी तेथील कर्मचारी त्यांना ९व्या मजल्यावरील सॅम्पल फ्लॅट दाखविण्यासाठी घेऊन गेले. फ्लॅट पाहिल्यानंतर इतर बांधकाम पाहत असताना त्या आचानक तोल जाऊन खाली पत्रा, सळया इत्यादी ठेवलेल्या ठिकाणी पडल्या. डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती कोथरूड पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी पथक गेले. दरम्यान, अनुश्री पांडे या नेमक्या कशा पडल्या, त्यांना फ्लॅट दाखविण्यासाठी कोणता कर्मचारी गेला होता, याचा तपास पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)