कामगाराचा मृत्यू , ठेकेदार अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 03:15 AM2018-12-16T03:15:03+5:302018-12-16T03:15:19+5:30
हडपसर येथील घटना : गट्टू डोक्यात पडला
पुणे : हडपसर येथे खोलीचा पोटमाळा पाडण्याचे काम सुरू असताना सिमेंटचा गट्टू डोक्यात पडून गंभीर जखमी झाल्याने बिगारी कामगाराचा मृत्यू झाला. कामगारांच्या सुरक्षेची काळजी न घेता हलगर्जीपणा केल्या प्रकरणी ठेकेदाराला अटक केली आहे.
येमलाप्पा भीमलाप्पा चव्हाण (वय ५५, रा़ हिंगणेमळा, हडपसर) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. ही घटना २ मे २०१८ रोजी मांजरी रोडवरील गोविंद सुभाषनगर येथे घडली होती़ मारुती लक्ष्मण गुंजवटे (वय ५०, रा़ हिंगणेमळा, हडपसर) असे अटक केलेल्या ठेकेदाराचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक बालाजी मगर यांनी फिर्याद दिली आहे.
हडपसर येथे मांजरी रोड परिसरातील अजित वाढेकर यांच्या घरातील खोली पाडण्याचे काम २ मे २०१८ रोजी सुरू होते. त्या वेळी ठेकेदार मारुती गुंजवटे यांच्या देखरेखीखाली हे काम सुरू असताना खोलीचा पोटमाळा पाडताना सिमेंटचा गट्टू कामगार येमलाप्पा चव्हाण याच्या डोक्यात पडून ते गंभीर जखमी झाले़ त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. खोलीचा पोटमाळा पाडताना बिगारी कामगारांच्या जीविताच्या सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता त्यांना अपघातापासून बचाव करण्यासाठी त्यांना हेल्मेट किंवा इतर साहित्य ठेकेदार गुंजवटे यांनी पुरविले नाही.