कुत्रा चावल्याने कामगाराचा मृत्यू, वेळेवर योग्य उपचार न केल्याची नातेवाईकांची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 11:59 AM2021-02-26T11:59:16+5:302021-02-26T11:59:33+5:30
मुकेश पाणीपुरी कारखान्यात काम करत असताना तेथील भटक्या कुत्र्याने त्याच्या पायाला चावा घेतला होता.
पुणे: पाणीपुरीच्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना कुत्रा चावल्यानंतर योग्य उपचार न केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना केशवनगर मुंढवा येथे घडली. मुकेश बहादुर बैठा (वय 33, रा. बाबा कल्याणी गल्ली, केशव नगर मुंढवा, मूळ रा. चंपारण्य बिहार ) या कामगाराचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मुकेश हा गेल्या अनेक वर्षांपासून केशव नगर मुंढवा येथील पाणीपुरी कारखान्यात काम करत होता. काही दिवसापूर्वी कारखान्यात काम करत असताना तेथील भटक्या कुत्र्याने त्याच्या पायाला चावा घेतला होता. 19 फेब्रुवारी रोजी त्याला त्रास होऊ लागल्याने त्याने त्याचा चुलत भाऊ जुगल बैठा याला फोन करून सांगितले. त्यामुळे मुकेश याला वडगाव शेरी येथील दवाखान्यात प्राथमिक उपचार केले. त्याला कुत्र्याने चावा घेतला असून मोठ्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल करावे असे त्या डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर बुद्रानी हॉस्पिटल येथे नेले असता त्याला नायडू हॉस्पिटल ला दाखल करावे असे तेथील डॉक्टरांनी सांगितले. त्याच रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास त्याला नायडू हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान 23 फेब्रुवारी रोजी पहाटे त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई,पत्नी,दोन लहान मुले असा परिवार आहे.
मुकेश हा अनेक दिवसांपासून या पाणीपुरी कारखान्यात काम करत होता. त्याला कुत्रा चावल्यानंतर त्याला तातडीने योग्य उपचार मिळाले नाहीत. तसेच कुत्रा चावल्याची माहिती नातेवाईकांना देण्यात आली नाही. त्याला योग्य उपचार मिळाले असते अथवा त्याच्या नातेवाईकांना याची माहिती मिळाली असती तर कदाचित त्याचा जीव वाचू शकला असता असे त्याच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. याप्रकरणी त्याच्या कुटुंबीयांनी कामगार आयुक्त पुणे विभाग तसेच सहसंचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
पुणे शहरात अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या प्रमाणावर असे कारखाने चालवण्यात येतात. या ठिकाणी अशा वेगवेगळ्या घटना घडतात. संबंधित कारखान्यांचे मालक अथवा त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या व्यक्तींकडून नियमांची अंमलबजावणी न झाल्यामुळे अशा एखाद्या गोरगरीब मजूर कामगाराचा दुर्दैवी मृत्यू होऊ शकतो. मात्र त्याकडे कामगार विभाग तसेच इतर प्रशासकीय विभागाचे दुर्लक्ष होत आहे.