दरोडेखोरांच्या हल्ल्यातील जखमी पत्नीचाही मृत्यू
By admin | Published: April 11, 2016 12:43 AM2016-04-11T00:43:42+5:302016-04-11T00:43:42+5:30
बारामती तालुक्यातील मोरगाव येथे चार दिवसांपूर्वी सशस्त्र दरोड्यातील गंभीर जखमी झालेल्या पतीपाठोपाठ जखमी पत्नीचाही शनिवारी (दि. ९) मध्यरात्री मृत्यू झाला
मोरगाव : बारामती तालुक्यातील मोरगाव येथे चार दिवसांपूर्वी सशस्त्र दरोड्यातील गंभीर जखमी झालेल्या पतीपाठोपाठ जखमी पत्नीचाही शनिवारी (दि. ९) मध्यरात्री मृत्यू झाला. येथील गुन्ह्याचा तपास करण्यात वडगाव निंबाळकर पोलिसांना अपयश आले आहे. पुढील आठ दिवसांत तपास करावा; अन्यथा आम्हाला पर्याय शोधावा लागेल, असा पवित्रा आज ग्रामस्थांनी घेतला आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी सोमवारी (दि. ११) मोरगाव ‘बंद’चा इशारा देण्यात आला आहे.
मोरगाव-जेजुरी रस्त्यालगत असलेल्या जय गणेश मंगल कार्यालयाशेजारी राहत्या घरी मंगळवारी (दि. ६) ही दुर्दैवी घटना घडली. यामध्ये जगन्नाथ विठ्ठल तावरे यांच्यासह पत्नी कमल जगन्नाथ तावरे यांच्यावर पहाटे ४ च्या सुमारास अज्ञात तीन दरोडेखोरांनी हल्ला करून जबर मारहाण केली होती. यादिवशी गावात अन्य दोन ते तीन ठिकाणी या दरोडेखोरांनी घरात घुसून अशाच स्वरूपाची जबर मारहाण केल्याचा प्रकार घडला.
आज या दोघांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर हजारोंच्या संख्येत ग्रामस्थांनी या परिसरात गर्दी केली. यांच्या घरासमोर दोघांचे पार्थिव सकाळी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
या विषयाचे गांभीर्य पाहता अनुचित प्रकार घडू नये, म्हणून ग्रामीण पोलीस दलाचे अधिकारी, कर्मचारी यांचा पोलीस बंदोबस्त येथे ठेवण्यात आला होता.
या प्रकरणाचा वडगाव निंबाळकर पोलिसांना योग्य तपास लागत नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. घटनेच्या दिवशी मोरगाव पोलीस मदत केंद्रात एकही कर्मचारी हजर नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. याबाबत गंभीर दखल घ्यावी, आठ दिवसांत आरोपीचा शोध घ्यावा; अन्यथा परिणामांना तयार राहा, असा इशारा नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक बबन अप्पा तावरे यांनी श्रद्धांजली वाहताना दिला आहे. (वार्ताहर)
> सहा महिन्यांतील
हा दुसरा प्रकार
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील या गावांत सशस्त्र दरोडा टाकण्याचा सहा महिन्यांतील हा दुसरा प्रकार आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास प्रलंबित आहे. या गुन्हेगारांना शोधण्यास अपयश आल्याचा आरोप करीत, या वेळी श्रद्धाजंली वाहत असताना जाहीर नाराजी व्यक्त करण्यात आली. या घटनेचा निषेध करण्यासाठी सोमवारी गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती नीरा बाजार समिती माजी संचालक बबन अप्पा तावरे यांच्यासह सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक पोपटराव तावरे यांनी दिली.