उड्डाणपुलाच्या खड्ड्यात पडून युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 01:22 AM2018-10-14T01:22:51+5:302018-10-14T01:23:45+5:30
मांजरी येथील प्रकार : काम बंद पाडण्याचा संतप्त नागरिकांचा इशारा
मांजरी : मांजरी बुद्रूक येथे रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी पाडलेल्या खड्ड्यात पडून तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मयत तरुणाचे नाव सतीश ज्ञानेश्वर पिसे (वय २६, रा. मलठण फाटा, ता. शिरूर) असे आहे. सतीश हा एका गॅस एजन्सीमध्ये कामाला होता. तो शनिवारी पहाटे मांजरी बुद्रुकवरून हडपसरच्या दिशेने दुचाकीवरून जात असताना हा अपघात झाला.
ठेकेदाराच्या कामाच्या चुकीच्या पद्धतीमुळे हा अपघात झाला असावा असा अंदाज नागरिकांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष सुरेश घुले यांनी संबंधित ठेकेदार, कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. तसेच जोपर्यंत नागरिकांना पर्यायी रस्त्याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत काम चालू करू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे आहे.
तसेच या प्रकरणी ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी माजी आमदार शिवसेना पुणे शहरप्रमुख महादेव बाबर यांनीही हडपसर पोलीस स्टेशनला येऊन पोलिसांना दिलेल्या निवेदनात केली आहे. हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी गुन्हेचे पोलीस निरीक्षक हमराज कुंभार, शिवसेना विभागप्रमुख विक्रम लोणकर, संतोष होडे, राम खोमणे, अशोक भंडारी, दिलीप व्यवहारे, योगेश जैन, दादा आहिरे, विजू दरेकर, दत्ता खवळे आदी उपस्थित होते.