विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू, महावितरणाचा हलगर्जीपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 02:21 AM2018-12-02T02:21:09+5:302018-12-02T02:21:12+5:30
बावधन बुद्रुक येथील सिद्धार्थ नगर येथे विजेच्या खांबाला हात लागुन शॉक बसल्याने तरुणाचा दुर्दवी मृत्यु झाल्याची घटना काल घडली.
भूगाव: बावधन बुद्रुक येथील सिद्धार्थ नगर येथे विजेच्या खांबाला हात लागुन शॉक बसल्याने तरुणाचा दुर्दवी मृत्यु झाल्याची घटना काल घडली. या घटनेने महावितरणाचा हलगर्जीपणा उघड झाला असुन घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शुभम प्रविण पवार (वय १७ वर्षे, रा. बाबाकृपा बिल्डीग, विठ्ठल मंदिरा जवळ, बावधन बुद्रुक, ता. मुळशी) असे तरुणाचे नाव असुन बावधन गावठाणातील राजगुरु चौकामध्ये भर गर्दिच्या ठिकाणी कोपऱ्यावरच असलेल्या विजेच्या पोलला दुपारी साडेतीनच्या दरम्यान हात लागल्याने जोरदार झटका बसला. येथील नागरिकांनी त्याला त्वरीत खासगी रुग्नालयात दाखल केले. परंतु काही वेळाने डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.
परिसरातील बावधन गावठाणाव्यतीरिक्त सर्व ठिकाणी विद्युत तारा ह्या भुमीगत झाल्या आहेत. या भागातील विद्युत
तारा भूमीगत कराव्यात यासाठी ग्रामपंचायत सदस्य मयुर कांबळे यांनी वारंवार महावितरणाशी पत्रव्यवहार केला होता. परंतु अधीकारी मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे.
बावधन बुद्रुक मध्ये सध्या रहदारी वाढत आहे. बाजाराच्या ठिकाणी अनेक ठिकाणी विद्युत तारा जमीनीपासुन अगदी जवळ आल्या आहेत. मिरवणुक अथवा मोठ्या गाड्या आल्यास या ठिकाणी वायरमनला फोन करुण विज बंद करावी लागते.
याच परिसरात काही महिण्यांपूर्वी मंदिरावर ध्वज काढण्यासाठी एका विद्यार्थ्यालाही झटका बसला असल्याची घटना ताजी असताना महावितरणाला जाग कशी येत नाही? आणखी किती बळी गेल्यावर यावर उपाय काढणार असा संतप्त सवाल नागरिकांकडुन विचारला जात आहे.
>बावधन गावठाण परिसरात भर बाजाराच्या ठिकाणी विजेच्या तारा धोकादायक परिस्थितीत आहे. अनेक घरांच्या पत्रा, गॅलरीजवळुन विजेवाहक तारा गेल्या आहेत. यामुळे वरंवार अपघात होत आहे. अनेकदा तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. या तारा त्वरित हटवुन भुमीगत कराव्यात.
- मयुर कांबळे
(ग्रामपंचायत सदस्य, बावधन)
यासंबंधी सर्व माहिती विद्युत निरिक्षकांना कळविली असुन त्यांचा आहवाल आल्यास घटनेचे कारण स्पष्ट होईल. विद्युततारा भुमिगत करण्याचे काम चालु असुन लवकरच याठीकाणच्या तारा भुमीगत करण्यात येतील.
-निशीकांत राऊत (जनसंपर्क अधिकारी, महावितरण)