वडीलांच्या मृत्यूचा मानसिक धक्का बसलेल्या तरुणाचा मारहाणीत मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2019 03:51 PM2019-04-28T15:51:23+5:302019-04-28T15:53:09+5:30
नोकरीच्या शोधात पुण्यात आलेल्या नेपाळी तरुणाच्या मृत्युप्रकरणी चंदननगर पोलिसांनी तिघांना अटक केली. वडिलांच्या निधनाने मानसिक धक्का बसलेल्या या विक्षिप्त तरुणाचा तिघांनी केलेल्या मारहाणीत उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता.
विमाननगर : नोकरीच्या शोधात पुण्यात आलेल्या नेपाळी तरुणाच्या मृत्युप्रकरणी चंदननगर पोलिसांनी तिघांना अटक केली. वडिलांच्या निधनाने मानसिक धक्का बसलेल्या या विक्षिप्त तरुणाचा तिघांनी केलेल्या मारहाणीत उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. अर्जुन लामिछाने (वय ३५, रा. सध्या खराडी मूळ रा.नेपाळ) असे त्याचे नाव आहे.
राजेश ईश्वर जाधव (वय ४५), पोपट ऊर्फ रमेश बालाजी बक्के (वय २९), बाबुराव कानीराम राठोड (वय ४०, सर्व रा़ भैरवनाथ मंदिराजवळ, खराडी गावठाण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस निरीक्षक कृष्णा इंदलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार,अर्जुन हा नोकरीच्या शोधात २३ एप्रिल रोजी पुण्यात खराडी येथे त्याच्या मित्राकडे आला होता. २४ एप्रिल रोजी पहाटे त्याने शेजारी राहणाऱ्या सीमा बालघरे यांचा दरवाजा वाजवून पाणी मागितले. तसेच राजू जाधव याला दगड मारुन मारहाण केली. राठोड यांच्या पत्नीचा हात ओढला. यावेळी राजू जाधव, राठोड व पोपट बक्के या तिघांनी त्याला लाकडी दांडक्यासह लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्या नंतर अर्जुन धावाधाव करीत काही अंतरावरील कचराकुंडी जवळ जाऊन गोंधळ करु लागला. त्याला त्रास होऊ लागल्याने नागरिकांनी त्याला खाजगी रूग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यु झाला.
पोलिस उपायुक्त प्रसाद अक्कानवरू, सहाय्यक आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. अर्जुन याच्या मृत्युला कारणीभूत झाल्याबद्दल चंदननगर पोलिसांनी तिघांना अटक केली. अर्जुन याच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले आहे. तेव्हापासून त्याचे मानसिक संतूलन बिघडले आहे. वडिल मला बोलावून घेत आहेत. मंदिराच्या पुजाऱ्याच्या मंत्राचे आवाज येत आहेत. असे तो मित्रांना सांगत होता. आदल्या दिवशीच तो पुण्यात नोकरीच्या शोधात आला होता. याविक्षिप्त अवस्थेत त्याच्याकडून वादविवाद व मारहाण झाली. इतर तिघांनी केलेल्या मारहाणीनंतर त्याचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला. त्याच्या पश्चात पत्नी, एक लहान मुलगी व भाऊ असा परिवार आहे. अंत्यविधीसाठी त्याचा मृतदेह भावाने नेपाळ येथे शनिवारी नेला. पोलीस उपनिरीक्षक किरण वराळ अधिक तपास करीत आहेत.