तळ्यातील गाळात अडकून तरुणाचा मृत्यू
By admin | Published: May 3, 2015 05:53 AM2015-05-03T05:53:42+5:302015-05-03T05:53:42+5:30
निमगाव खंडोबा येथे खंडोबाच्या दर्शनसाठी आलेल्या म्हाळुंगे येथील रवींद्र अनिल शिवले (वय ३०) या युवकाचा येथील तळ्यात पोहताना गाळात
दावडी : निमगाव खंडोबा येथे खंडोबाच्या दर्शनसाठी आलेल्या म्हाळुंगे येथील रवींद्र अनिल शिवले (वय ३०) या युवकाचा येथील तळ्यात पोहताना गाळात अडकून बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल दि. १ मे रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत खेड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भोसरी पुणे येथून ४ तरुण कनेरसर आणि निमगाव खंडोबा येथे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सुट्टी असल्याने आले होते. कनेरसर येथे यमाई दर्शन घेवून ते निमगाव खंडोबा येथे दर्शनासाठी जात होते. श्री खंडोबा मंदिराच्या पायथ्याशी आले असता, त्यांनी येथील तळ्यात अांघोळ करून दर्शन घेण्याचे ठरवले. चारही मित्र आंघोळ करीत असताना रवींद्र अनिल शिवले (वय ३०, रा. म्हाळुंगे, ता. खेड) याचा तळ्यातील गाळात अडकून बसल्याने बुडून मृत्यू झाला.
या चौघांना पोहता येत नसल्याने इतर तिघांनी त्यास वाचविण्यासाठी आरडाओरडा केला. मंदिरावरील ग्रामस्थ आणि भाविकांनी तळ्याकडे धाव घेतली. या तळ्यातील पाण्यात उतरून त्यांनी रवींद्रचा शोध घेतला. तो गाळात अडकून पडला होता. त्याला वाचवण्यासाठी जवळपास २० मिनिटे वेळ गेल्याने बुडून मृत्यू झाला. त्याचा विवाह झाला होता. याबाबत निमगाव खंडोबाचे पोलीस पाटील बाळासाहेब शिंदे यांनी खेड पोलिसांत खबर दिली.
(वार्ताहर)