कुरुळी यात्रेत फटाक्यांच्या आताषबाजीत भाजलेल्या युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 01:24 PM2018-04-20T13:24:29+5:302018-04-20T13:25:50+5:30
यात्रेनिमित्त फटाक्यांच्या आताषबाजीसाठी संगमनेर येथील शोभेच्या दारूकामाचे सादरीकरण करणारे लोक बोलावण्यात आले होते.आताषबाजीचा खेळ सुरु असताना फटाक्यांची एक ठिणगी फटाक्यांच्या गोणीवर पडली. यामुळे सर्व फटाक्यांचा एकदम स्फोट झाला.
कुरुळी: कुरुळी (ता.खेड) येथील ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त सालाबादप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीत दहा दिवसांपूर्वी भाजून जखमी झालेल्या तिघांपैकी एका युवकाचा पुण्यातील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रितेश विलास डोंगरे (वय १८ रा. कुरुळी, ता. खेड ) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरुळी (ता. खेड) यात्रेनिमित्त गावच्या भैरवनाथ महाराज ग्रामदैवताच्या पुजेनंतर रविवारी (दि. ८ एप्रिल) रोजी रात्री काराच्या सुमारास गावात फटाक्याची आताषबाजीचे आयोजन करण्यात आले होते. या फटाक्यांच्या आताषबाजीसाठी संगमनेर येथील शोभेच्या दारूकामाचे सादरीकरण करणारे लोक बोलावण्यात आले होते. गावातील नागरिकांनीही यात मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास गावातील आताषबाजीचा खेळ सुरु असताना फटाक्यांची एक ठिणगी फटाक्यांच्या गोणीवर पडली. यामुळे सर्व फटाक्यांचा एकदम स्फोट होऊन सय्यद करीम अब्दुल रहेमान ( वय ५५) अजय महागडे ( वय ३० दोघेही रा. मुगलपुरा , ता. संगमनेर, जि. अहमदनगर) व रितेश डोंगरे ( वय १८ ) हे तिघे भाजले होते. त्यातील रितेश याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत सर्वाधिक भाजलेल्या अहमदनगरच्या अजय महागडे यांचीही प्रकृती चिंताजनक होती.
दरम्यान रितेश डोंगरे कुरुळीच्या गोल्डन कुस्ती संकुल (डोंगरेवस्ती) कुस्ती खेळाचे प्रशिक्षण घेत होता. कुस्ती मध्ये रितेशने तालुका, जिल्हा पातळीवर विविध ठिकाणी यश मिळवले होते. रितेश याच्या पश्चात आई, वडील,तीन बहिणी, असा मोठा परिवार आहे. खेड केसरी पै.दिपक डोंगरे यांचा पुतण्या होता.