पुण्यात शिवसृष्टीच्या निधीवरून वादाला सुरुवात, राजकीय पक्ष उतरले मैदानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 05:35 PM2018-05-11T17:35:26+5:302018-05-11T17:36:20+5:30
महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीच्या वाटेत अनेक अडथळे येत असताना खासगी प्रकल्पाला आधी निधी जाहीर झाल्याने शहरात नव्या वादाला तोंड फुटले आहे.
पुणे : पुणे शहरातील कात्रज परिसरात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुढाकारातून उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीला केंद्र सरकारच्या जेएनपीटी योजनेच्या अंतर्गत ५ कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असल्याची घोषणा गुरुवारी करण्यात आली. महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीच्या वाटेत अनेक अडथळे येत असताना खासगी प्रकल्पाला आधी निधी जाहीर झाल्याने शहरात नव्या वादाला तोंड फुटले आहे. या याविषयावर विविध संघटना, इतिहास अभ्यासक आणि राजकीय पक्षांनी मते नोंदवली आहेत.
याबाबत महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या की,बाबासाहेब पुरंदरे यांच्यामार्फत उभारण्यात येणारी शिवसृष्टी खासगी संस्था आहे. त्यांना निधी मागण्याचा अधिकार आहे.त्यांना किती निधी द्यायचा ते राज्य आणि केंद्र सरकार ठरवतील. आम्ही महापालिकेच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीचा पाठपुरावा करणार आहोत असे त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे महापालिकेचे विरोधीपक्षनेते चेतन तुपे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. भाजपने पुणेकरांच्या भावनेशी खेळ थांबवावा. १५ दिवसात निर्णय घेऊ सांगणारे मुख्यमंत्री एक शब्दही उच्चारायला तयार नाहीत अशा शब्दात त्यांनी आपला रोष वाक्य केला. कात्रजला उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीच्या आतमध्ये नेमके काय दाखवणार आहेत हे देखील सांगितलेले नाही.कुठलाही आराखडा समोर नसताना तिथे काय करणार आहेत तरी कळायला हवे असेही ते म्हणाले.
ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी तर तिसरीच भूमिका मांडली असून पुणेकरांना कात्रज आणि चांदणी चौक या दोन्ही भागातील शिवसृष्टी लांब पडत असून शनिवरवाड्यावर तिसरी शिवसृष्टी उभारावी अशी अजब मागणी केली. कात्रज येथे उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीचे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार यांनी आम्ही आठ महिन्यांपूर्वी जेएनपीटीच्या अंतर्गत असणाऱ्या सीएसआरच्या माध्यमातून निधीची मागणी केल्याचे सांगितले. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळून निधी जमा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान शिवसृष्टीचे काम सुमारे ४० टक्के पूर्ण झाले असून पुढील दोन वर्षात संपूर्ण काम पूर्ण करण्याचे ध्येय असल्याचेही ते म्हणाले.