गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या प्रभाताईंचे ९२ व्या वर्षात पदार्पण; पुण्यात जाहीर सत्कार होणार
By श्रीकिशन काळे | Published: September 5, 2023 04:52 PM2023-09-05T16:52:15+5:302023-09-05T16:52:33+5:30
कार्यक्रमात डाॅ. प्रभा अत्रे यांच्या संगीत प्रवासावर आधारीत माहितीपट दाखविण्यात येणार
पुणे: गेल्या काही दशकांपासून स्वरयोगिनी जेष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे या आपली गायन सेवा करत आहेत. त्यांच्या गायकीने रसिक मंत्रमुग्ध होतात. त्यांचे नुकतेच ९२ व्या वर्षात पदार्पण होणार आहे. त्यानिमित्त त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
आपला परिसर,तरंगिणी सांस्कृतीक प्रतिष्ठान आणि माजी विरोधी पक्ष नेते उज्जवल केसकर यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मविभूषण स्वरयोगिनी डाॅ. प्रभाताई अत्रे यांचा ९२ व्या वर्षात पर्दापणानिमित्त जाहीर सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे प्रमुख आणि ज्येष्ठ गायक शौनक अभिषेकी आणि आपला परिसरचे प्रमुख महेश पानसे यांनी आज आयोजीत पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यक्रमाबाबत अधिक माहिती देताना शौनक अभिषेकी म्हणाले, महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण आणि पालकमंञी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हा सत्कार होणार असून माजी आमदार उल्हास पवार यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार आहेत. सत्कार सोहळ्यानंतर डाॅ. प्रभा अत्रे यांना मानवंदना म्हणुन त्यांच्या शिष्या अश्र्विनी मोडक आणि पंडित आनंद भाटे यांचे गायन होणार आहे. यावेळी डाॅ. प्रभा अत्रे यांच्या संगीत प्रवासावर आधारीत माहितीपट दाखविण्यात येणार आहे. तसेच डाॅ. प्रभा अत्रे यांच्या नऊ दशकांच्या संगीत , संगीत नाटक, साहित्य, शिक्षण, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात दिलेल्या योगदानावर आधारीत लेखांचा अनंत-प्रभा हा ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम पुणेकरांसाठी विनिमुल्य खुला असून पुणेकर रसिकांनी मोठ्या संख्येने या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे प्रमुख आणि ज्येष्ठ गायक शौनक अभिषेकी आणि आपला परिसरचे प्रमुख महेश पानसे यांनी केले आहे.