शनिवार पासून डेक्कन व डेक्कन क्वीन धावणार , पुणेकरांना विस्टाडोम कोच मधून घाटातील सौंदर्य न्याहाळता येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:09 AM2021-06-24T04:09:39+5:302021-06-24T04:09:39+5:30
पुणे : रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. गेल्या अनेक दिवसांपासून खंडित झालेली पुणे - मुंबई इंटरसिटी गाड्या शनिवार (दि. ...
पुणे : रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. गेल्या अनेक दिवसांपासून खंडित झालेली पुणे - मुंबई इंटरसिटी गाड्या शनिवार (दि. २६) पासून पुन्हा सुरू होत आहे. तसेच प्रथमच पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर डेक्कन एक्सप्रेसला विस्टाडोम कोच जोडण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना घाटातील सौंदर्य पाहता येणार आहे. एका प्रवाशास ८३५ रुपये तिकीट दर असणार आहे.
डेक्कन क्वीन ही गाडी २५ जून रोजी मुंबईतून सायंकाळी ५ वाजून १० मिनिटांनी निघेल. पुण्याला रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी पोहचेल. २६ जून रोजी पुणे स्थानकावर याची नियमित सेवा सुरू होईल.
मुंबई-गोवा रेल्वे मार्गावर धावणाऱ्या जनशताब्दी गाडीला व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला. याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. आता मुंबई-पुणे मार्गावर डेक्कन एक्सप्रेसला दुसरा विस्टाडोम चा कोच जोडला जाईल. प्रवाशांना माथेरान टेकडी (नेरळ जवळील), सोनगीर टेकडी (पळसधरी जवळील), उल्हास नदी (जांबरूंग जवळील), उल्हास व्हॅली, खंडाळा परिसर इ. चा आणि लोणावळा आणि दक्षिण पूर्व घाट विभागातील बोगदे आणि धबधबे या निसर्गरम्य सौंदर्याचा व अनुभवाचा आनंद घेऊ शकतात.
डेक्कन एक्सप्रेस (०१००७) शनिवारी सकाळी ७ वाजता मुंबई स्थानकावरून सुटेल. पुण्याला ११ वाजून पाच मिनिटांनी पोहोचेल.
हीच गाडी (०१००८) पुणे स्थानकावरून दुपारी सव्वातीनला निघेल. सायंकाळी सात वाजून पाच मिनिटांनी मुंबईला पोहोचेल.
बॉक्स १ विस्टाडोम चे वैशिष्ट्ये :
१. एलएचबी कोच असलेला हा देशातील पहिला डबा, यापूर्वी आयसीएफ डबे जोडले होते.
२. ताशी १८० किमी वेगाने धावणार. देशात सध्या हा वेग सर्वाधिक आहे.
३. मोठ्या प्रमाणांत काचेच्या खिडक्या व काचेचे छप्पर. त्यामुळे प्रवाशांना सह्याद्री रांगेतील पावसाळी सौंदर्य सहज पाहता येईल.
४. डब्यांच्या एका बाजूला मोठी मोकळी जागा. प्रवासी येते उभे राहून प्रवासाचा आनंद घेऊ शकतील.
५. एका डब्यांत ४४ सीटची आसन क्षमता. हे सीट १८० डिग्री मध्ये फिरतात.
६. संगीत प्रेमींसाठी डिजिटल डिस्प्ले स्क्रीन आणि स्पीकर्स.
७. वायफायची सुविधा.