पुण्यातील डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्याच्या वास्तुचे शंभराव्या वर्षात पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 09:46 PM2021-10-01T21:46:43+5:302021-10-01T21:46:52+5:30
१९२२ च्या सुमारास त्याठिकाणी भाजेकर पॅव्हेलियन बांधण्यात आले होते
पुणे : डेक्कन जिमखाना संस्थेची स्थापना १९०६ मध्ये झाली. या संस्थेचे मुख्य संस्थापक कै. बंडोपंत नारायण भाजेकर होते. त्यांचे चुलत भाऊ लक्ष्मण भाजेकर संस्थेचे पहिले जनरल सेक्रेटरी होते. त्यांनी १९०८ ते १९११ दरम्यान काम केले. लक्ष्मण भाजेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १९२२ च्या सुमारास भाजेकर पॅव्हेलियन बांधण्यात आले होते. या ‘पॅव्हेलियन’ म्हणजेच आताच्या डेक्कन पोलिस ठाण्याची वास्तू १०० व्या वर्षांत पर्दापण करीत आहे. त्या पार्श्वभूमीवर डेक्कन जिमखाना क्लब आणि पुणे पोलिसांच्या वतीने विशेष कार्यक्रम पार पडला.
शहरातील ऐतिहासिक वास्तू जेवढ्या जुन्या, तेवढे त्यांचे महत्व वाढणार आहे. अशाच एका ऐतिहासिक वास्तूचा डेक्कन पोलीस ठाणे घटक असल्याचा अभिमान आहे, असे गौरवोद्गार पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी काढले. बहुतांश पोलीस ठाण्यांच्या नावात ठिकाणाचा उल्लेख आहे. मात्र, जिमखान्याच्या नावाने असलेले हे पुण्यातील एकमेव पोलीस ठाणे आहे. पुणे शहराचा विकास आणि विस्तार झाला. उपनगरात नवनवीन वास्तू उभ्या राहिल्या. मात्र, त्यानंतरही डेक्कन जिमखाना परिसराचे महत्व अबाधित राहिले आहे असेही ते म्हणाले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. नामदेव चव्हाण, सहायक आयुक्त बजरंग देसाई,सहायक आयुक्त सुषमा पाटील, वरिष्ठ निरीक्षक मुरलीधर करपे आणि डेक्कन जिमखाना क्लबचे सरचिटणीस विश्वास लोकरे, जय आपटे यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.