डेक्कन ओडिसी ट्रॅकवर; परदेशी पर्यटकांना घडणार महाराष्ट्राचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 03:18 PM2021-12-10T15:18:47+5:302021-12-10T15:18:58+5:30
टूर ऑपरेटरसाठी डेक्कन ओडिसीसाठी काढलेल्या जागतिक निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला असून १५ जानेवारीपर्यंत प्रवासाची तारीख निश्चित होणार
प्रसाद कानडे
पुणे : देशांतील प्रसिद्ध शाही रेल्वेपैकी एक असणाऱ्या डेक्कन ओडिसी आता पुन्हा ट्रॅकवर धावण्यास सज्ज होत आहे. टूर ऑपरेटरसाठी डेक्कन ओडिसीसाठी काढलेल्या जागतिक निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला असून १५ जानेवारीपर्यंत प्रवासाची तारीख निश्चित होणार आहे. कोरोनाच्या ‘ओमायक्रॉन’चे संकट टळले तर फेबुवारी पर्यटकांना डेक्कन ओडिसीतून महाराष्ट्र्राचे सौंदर्य पाहता येईल. त्या दृष्टीने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा (एमटीडीसी)ने तयारी देखील सुरू केली आहे.
कोरोनाच्या काळात अन्य रेल्वे प्रमाणेच डेक्कन ओडिसीची देखील सेवा बंद झाली. डेक्कनचे प्रवासी हे विशेषतः परदेशी पर्यटक आहेत. अनेक दिवस आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद असल्याने ते भारतात येऊ शकले नाही. आता कोरोनाचे रुग्ण कमी असल्याने व आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर तुलनेने कमी निर्बंध असल्याने परदेशी पर्यटक भारतात येत आहे. भारतात डिसेंबर व जानेवारी हा पर्यटकांच्या दृष्टीने पर्यटनास उत्तम असल्याने याच काळात देशांत मोठ्या टूर्स काढल्या जातात. त्यामुळे आता डेक्कन ओडिसीची सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी ने एमटीडीसी प्रयत्नशील आहे. काढण्यात आलेली निविदा ही जागतिक स्तरावरील असल्याने त्याला परदेशातून देखील चांगला प्रतिसाद मिळाला आहे. डिसेंबर अखेरपर्यंत निविदांची प्रक्रिया पूर्ण होईल. साधारणतः १५ जानेवारी पर्यंत डेक्कन ओडिसीचा महाराष्ट्रातला प्रवास सुरू करण्याची तारीख ठरेल.
महाराष्ट्रातला प्रवास
भारतीय रेल्वे व एमटीडीसी यांच्यातील कराराप्रमाणे २००५ पासून डेक्कन ओडिसी धावत आहे. महाराष्ट्रात ही आठ दिवस व सात रात्र प्रवास करते. मुंबईतून प्रवासाला सुरुवात होते. यात नाशिक, औरंगाबाद, अजंठा, कोल्हापूर, गोवा, सिंधुदुर्ग असे करीत पुन्हा मुंबईला प्रवासाचा शेवट होईल. यात युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या अजिंठा आणि एलोरा लेणीचा देखील समावेश आहे.
“डेक्कन ओडिसी सुरु करण्यासाठी नव्या निविदा मागविल्या आहेत. त्याची प्रक्रिया डिसेंबर पर्यंत चालेल. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा जर उद्रेक झाला नाही तर जानेवारी मध्ये आम्ही गाडी सुरू करण्याची तारीख जाहीर करू. त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरु झाले आहेत असे मुंबई एमटीडीसीचे सरव्यवस्थापक दिनेश कांबळे यांनी सांगितले.''