जूनपासून डेक्कन ओडिसी धावणार, नव्या रूपात नव्या ढंगात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 04:16 PM2022-04-08T16:16:02+5:302022-04-08T16:17:16+5:30

डेक्कन ओडिसी ही भारतातील चार शाही रेल्वेपैकी एक रेल्वे आहे....

deccan odyssey train will run from June in a new form indian railway | जूनपासून डेक्कन ओडिसी धावणार, नव्या रूपात नव्या ढंगात

जूनपासून डेक्कन ओडिसी धावणार, नव्या रूपात नव्या ढंगात

Next

-प्रसाद कानडे

पुणे : देशातील प्रसिद्ध शाही रेल्वेपैकी एक असणाऱ्या डेक्कन ओडिसी (deccan odyssey train) ही आता नव्या रूपात व नव्या ढंगात धावण्यास सज्ज होत आहे. डब्यांच्या रंगसंगतीपासून ते इंटीरियर डिझाईनपर्यंत सर्व प्रकारचे बदल करण्यास सुरुवात झाली आहे. एमटीडीसी (महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ) ने टूर ऑपरेटरची जबाबदारी इबिक्स कॅश ह्या आंतरराष्ट्रीय संस्थेस दिली आहे. जूनपासून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व वैभवशाली तसेच निसर्ग सौंदर्याने नटलेल्या स्थळाचे दर्शन पर्यटकांना घडणार आहे. यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच वाईल्ड लाईफ प्रेमींसाठी ताडोबाच्या सफरीचेदेखील आयोजन केले आहे.

डेक्कन ओडिसी ही भारतातील चार शाही रेल्वेपैकी एक रेल्वे आहे. कोरोनाच्या संकटकाळात बंद झालेली डेक्कन ओडिसी आता धावण्यास सज्ज होत आहे. जूनपासून पर्यटकांना डेक्कन ओडिसीतून महाराष्ट्राचे सौंदर्य पाहता येईल. त्या दृष्टीने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी)ने तयारीदेखील सुरू केली आहे. डेक्कन ओडिसीच्या २२ डब्यांचे पीओएच (पिरॉडिकल ओव्हर हॉलिंग) चे काम सुरू आहे. येत्या १० ते १५ दिवसांत हे काम पूर्ण होईल. त्यानंतर डबे अधिक आकर्षक दिसण्यावर भर दिला जाणार आहे. शिवाय पर्यटकांना आलिशान प्रवासाचा अनुभव यावा याकरिता डब्याच्या आतील बाजूने डेकोरेटरदेखील बदलण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या वैभवशाली स्थळाचे दर्शन घेताना प्रवासदेखील आलिशान व संस्मरणीय होईल, यासाठी एमटीडीसी प्रयत्नशील आहे.

महराष्ट्रातला प्रवास :
भारतीय रेल्वे व एमटीडीसी यांच्यातील कराराप्रमाणे २००५ पासून डेक्कन ओडिसी धावत आहे. महाराष्ट्रात ही आठ दिवस व सात रात्र प्रवास करते. मुंबईतून प्रवासाला सुरुवात होते. यात नाशिक, औरंगाबाद, अजंठा, कोल्हापूर, गोवा, सिंधुदुर्ग असे करीत पुन्हा मुंबईला प्रवासाचा शेवट होईल. यात युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या अजिंठा आणि एलोरा लेणीचादेखील समावेश आहे. शिवाय यंदा नागपूरसाठी देखील डेक्कन ओडिसी धावणार आहे. ताडोबा अभयारण्यासाठीदेखील डेक्कन ओडिसी धावणार आहे. शिवाय तीन दिवसांच्या सहलीचेदेखील आयोजन आहे. त्यामुळे त्याचे तिकीट दरदेखील कमी असतील.

ही आहे डेक्कन ओडिसीची भव्यता :

डेक्कन ओडिसी २२ डब्यांची रेल्वे. १ डबा पॅन्ट्री, १ डब्यांत आलिशान रेस्टॉरंट, तसेच कॉन्फरन्स हॉल, ४४ रूम, स्पा, जीम, बार, विविध देशातील स्वादिष्ट व्यंजन, शिवाय विविध स्थळी घेऊन जाण्याची जबाबदारी देखील एमटीडीसीची असणार आहे.

अन् महाराष्ट्राला मान :
देशात तीन राज्यांकडून ४ आलिशान रेल्वे चालविले जातात. यात महाराष्ट्र सरकारची डेक्कन ओडिसी, राजस्थान सरकारची दोन पॅलेस ऑन व्हील धावतात, तर कर्नाटक सरकारची गोल्डन चारोट याचा देखील समावेश आहे. मात्र, डेक्कन ओडिसी वगळता राजस्थान व कर्नाटक सरकारच्या रेल्वे इतक्यात तरी सुरू होणार नाहीत. त्यामुळे कोविडनंतर शाही रेल्वे सुरू करण्याचा मान डेक्कन ओडिसीच्या रूपाने महाराष्ट्राला मिळणार आहे.

जून महिन्यापासून डेक्कन ओडिसी धावणार आहे. पर्यटकांना प्रवासाचा अनुभव अधिक संस्मरणीय करण्यासाठी आम्ही विशेष मेहनत घेत आहोत. डब्याचे रंग ते आतील डिझाइन देखील बदलले जात आहे. शिवाय तीन दिवसांच्या फॅमिली टूरचे देखील आयोजन केले आहे. तारीख व दर लवकरच ठरविले जातील.
- दिनेश कांबळे, सरव्यवस्थापक, एमटीडीसी, मुंबई.

Web Title: deccan odyssey train will run from June in a new form indian railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.