Deccan Queen ला हिरव्या, लाल रंगांचा साज, नवे १० डबे खडकीत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 04:08 PM2022-02-18T16:08:58+5:302022-02-18T16:23:49+5:30

हिरव्या आणि लाल रंगाने सजलेले डबे व डायनिंग कार हे नव्या गाडीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे...

deccan queen coloured green red 10 new coaches in the khadki station yard | Deccan Queen ला हिरव्या, लाल रंगांचा साज, नवे १० डबे खडकीत दाखल

Deccan Queen ला हिरव्या, लाल रंगांचा साज, नवे १० डबे खडकीत दाखल

googlenewsNext

पुणे :पुणेकरांची लाडकी ‘दख्खनची राणी’ अर्थात ‘डेक्कन क्वीन’ एक्स्प्रेसला नवीन साज चढणार आहे. चेन्नई येथील आयसीएफ कोच डेक्कन क्वीनचे १० नवे डबे पुण्यात दाखल झाले आहेत. सध्या हे डबे खडकी स्थानकाच्या यार्डमध्ये ठेवण्यात आले. उर्वरित १० डबे मिळाल्यानंतर ही गाडी नव्या रूपात धावणार आहे; मात्र याला आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यांत डेक्कन क्वीन एक्सप्रेस नव्या रूपात धावण्याची शक्यता आहे.

हिरव्या आणि लाल रंगाने सजलेले डबे व डायनिंग कार हे नव्या गाडीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. डेक्कन क्वीन ही हेरिटेज रेल्वे असल्याने अहमदाबाद येथील एनआयडी (नॅशनल इन्स्टिट्यूट डिझाइन)ने याचे आरेखन केले आहे. तिची नवी रंगसंगती एनआयडी निवडली आहे. अशा प्रकारची ही देशातील पहिली रेल्वे आहे. चेन्नईतल्या आयसीएफ कारखान्यात या गाडीच्या डब्यांची निर्मिती झाली आहे.

डेक्कन क्वीनला विशेष दर्जा असल्याने रेल्वे बोर्डाने या गाडीच्या डब्याला सामान्य डब्याचा रंग न देता हिरव्या व लाल रंगाचा साज दिला आहे. हा बदल करताना डायनिंग कारमध्येही थोडा बदल केला आहे. पूर्वी कारमधील प्रवासी क्षमता फक्त ३२ होती ती आता वाढवून ४० करण्यात आली आहे.नवीन रेकी जानेवारीतच मुंबईत येणे अपेक्षित होते; मात्र त्याला विलंब झाला. आता रेल्वे प्रशासनाने मार्च महिन्यांत नवीन रेक मधून डेक्कन क्वीनचा प्रवास सुरु होणार असल्याचे सांगितले आहे.

डेक्कन क्वीन' भारतीय रेल्वेच्या शिरपेचातला मनाचा मानाचा तुरा-

भारतीय रेल्वेच्या १६९ वर्षांच्या प्रवासांत डेक्कन क्वीन एक्स्प्रेसचे स्थान वेगळे आहे. डेक्कन क्वीन ही भारतातील पहिली सुपरफास्ट दर्जाची रेल्वे आहे. पहिली लांब पल्याच्या मार्गावर विजेवर धावणारी रेल्वे, देशात वेस्टीब्युलचा वापर डेक्कन क्वीन मध्येच झाला, डायनिंग कार असलेली देशातील एकमेव रेल्वे आदी विविध वैशिष्ट्ये डेक्कन क्वीनच्या बाबतीत आहेत.

डेक्कन क्वीन जोड ९२ वर्षांचा प्रवास

१ जून १९३० या दिवशी डेक्कन क्वीन एक्स्प्रेस पुणे ते मुंबई धावू लागली. २०२२ मध्ये या गाडीने ९२ व्या वर्षात पदार्पण केले आहे. जेव्हा ही सुरू झाली तेव्हा ती त्या काळातील सर्वात गतिमान रेल्वे होती. आजही ही रेल्वे प्रवाशांची पहिली पसंती आहे. पाच रंगांमधून नवी रंगसंगती निवडण्यात आली. त्यास रेल्वे बोर्डानेही मान्यता दिली.

‘ चेन्नई येथील कारखान्यातून डेक्कन क्वीनचे १० डबे आले आहेत. उर्वरित १० डबे देखील लवकर मिळण्याची आशा आहे. डेक्कन क्वीन नव्या रूपात धावावी यासाठी आम्ही देखील उत्सुक आहोत . मार्च महिन्यात डेक्कन क्वीन नव्या रूपात धावण्याची शक्यता आहे.

- ए. के. गुप्ता, प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता, मध्य रेल्वे, मुंबई

डेक्कन क्वीनला एलएचबीचा रेक जोडण्यात आला . ही चांगली बाब आहे. मात्र याची रंगसंगती ही प्रवाशांना आवडलेली नाही. डेक्कन क्वीनचा जो आधी थाट होता त्याप्रमाणे डब्यांचे रंग असायला हवे होते. नव्या रंगामुळे प्रवाशांची निराशा होणार आहे.

-हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप, पुणे

Web Title: deccan queen coloured green red 10 new coaches in the khadki station yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.