डेक्कन क्वीनच्या ठेकेदाराला २५ हजार रुपयांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 08:59 PM2019-09-14T20:59:24+5:302019-09-14T20:59:43+5:30
डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारमधील खाद्यपदार्थांमध्ये अळ्या सापडल्या होत्या..
पुणे : डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारमधील खाद्यपदार्थांमध्ये अळ्या सापडल्याप्रकरणी संबंधित ठेकेदाराला इंडियन रेल्वे केटरिंग अॅन्ड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) कडून २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. डायनिंग कारमध्ये ऑम्लेटसोबत देण्यात आलेल्या सॉसमध्ये अळी सापडल्याची तक्रार प्रवाशाकडून करण्यात आली होती.
सोमवार पेठेत राहणारे सागर काळे यांनी मागील महिन्यात ही तक्रार दिली होती. काळे हे दि. १९ जुलै रोजी डेक्कन क्वीनमधून मुंबईहून पुण्याकडे निघाले होते. या प्रवासादरम्यान त्यांनी डायनिंग कारमध्ये ऑम्लेट मागविले होते. ते खाण्याआधी त्यांनी सॉस घेतला. त्यानंतर सॉसच्या बाटलीत अळ्या असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी ‘आयआरसीटीसी’च्या कर्मचाºयांना याबाबत कल्पना दिल्यानंतर त्यांनी ऑम्लेट बदलून देतो, असे सांगितले. त्यानंतर काळे यांनी आॅम्लेट व सॉसचा व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओसह त्यांनी दि. २१ ऑगस्ट रोजी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली. या प्रकाराची ‘आयआरसीटीसी’कडून चौकशी केली असता त्यात तथ्य आढळून आले. त्यामुळे केटरिंग ठेकेदाराला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पहिल्यांदाच असा प्रकार घडल्याने केवळ दंड ठोठावण्यात आला. त्यानंतर प्रत्येक तक्रारीनुसार दंडाची रक्कम व कारवाई बदलत जाते, असे अधिकाºयांनी सांगितले.
दरम्यान, रेल्वेने काही वर्षांपुर्वी खासगी ठेकेदाराला डायनिंग कारमध्ये खाद्यपदार्थ पुरविण्याचे काम दिल्यापासून त्याचा दर्जा घसरला आहे. त्यामुळे रेल्वेने पुन्हा ही जबाबदारी स्वत:वर घ्यायला हवी, अशी मागणी रेल्वे प्रवासी गु्रपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी केली आहे. तसेच ठेकेदाराला दंड करण्यात आल्याने दर्जेदार खाद्यपदार्थ पुरविण्याला प्राधान्य मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
---------