अखेर डेक्कन क्वीनची खानपान सेवा खासगी कंत्राटदाराकडे; डायनिंग कारही बदलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 07:15 PM2017-10-31T19:15:55+5:302017-10-31T19:48:08+5:30
पुणे-मुंबई दरम्यान धावणार्या प्रतिष्ठित डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारमधील खानपान सेवा अखेर खासगी कंत्राटदाराच्या ताब्यात गेली आहे़.
पुणे : पुणे-मुंबई दरम्यान धावणार्या प्रतिष्ठित डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारमधील खानपान सेवा अखेर खासगी कंत्राटदाराच्या ताब्यात गेली आहे़.
रेल्वे बोर्डाकडून खानपान सेवा काढण्यात आली असून बुधवारपासून खासगी कंत्राटदाराकडे त्याची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. रेल्वे बोर्डाचे कर्मचारी देखील बदलण्यात येणार असून खासगी कंत्राटदाराचे कर्मचारी नेमण्यात येणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.
रेल्वे बोर्डाने २८ सप्टेंबर रोजी डेक्कन क्वीनसह हावडा-यशवंतपूर एक्स्प्रेस, निजामुद्दीन गरीब रथ, चेन्नई एक्स्प्रेस, अवध एक्स्प्रेस या रेल्वेंच्या केटरिंग सर्व्हिस चालविण्याविषयीची मर्यादित निविदा काढण्यात आली होती. डेक्कन क्वीनची खानपान सेवा व्हरायटी पॅन्ट्री सर्व्हिसेस या कंपनीला १६ लाख ५१ हजार रुपयांत मिळाली आहे. कमी अंतराच्या मार्गावरील गाड्यांमधील पेट्री कार काढून टाकण्याचा निर्णय मध्यतरी रेल्वेने घेतला होता़ त्यानुसार डेक्कन क्वीनची डायनिंग कार काढण्यात आली होती़ परंतु, प्रवाशांचा विरोध लक्षात घेऊन रेल्वेने नवीन अत्याधुनिक डायनिंग कार जोडली होती़ आता मात्र, त्यांनी या डायनिंग कारचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला़ डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारमधील खानपानसेवेचे खासगीकरण झाल्यामुळे प्रवाशांनी तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त केली आहे. आता ही डायनिंग कार जावून पुन्हा एकदा जुनी पॅन्ट्री कार तिला जोडण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.
डेक्कन क्वीन १ जून १९३० पासून सुरु झाली़ इंग्रज सरकारने ही डायनिंग कार सुरु केली होती़ आता रेल्वे प्रशासन चालवत होते़ तिची सेवा उत्कृष्ट होती़ कोणाचीही तक्रारही नव्हती़ तरीही तिचे खासगीकरण करण्याचा रेल्वेचा निर्णय चुकीचा आहे़ आताच या डायनिंग कारचे सुशोभीकरण वाया जाणार आहे़ रेल्वेचा हा पूर्णपणे चुकीचा निर्णय आहे़
- हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप